NCP Crisis: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह 'घड्याळ' कोणाचे? निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी
निवडणूक आयोग (Election Commission) आजची सुनावणी पुढे ढकलणार की, आजच निर्णय देणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
शरद पवार (Sharad Pawar) गट विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) गट यांच्यातील संघर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष कोणाचा? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोग (Election Commission) आजची सुनावणी पुढे ढकलणार की, आजच निर्णय देणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात बंड करत वेगळी वाट धरली. इतकेच नव्हे तर त्यांनी चक्क शिवसेना पक्षावर दावा सांगितला. जो निवडणूक आयोगानेही मान्य केला आणि चक्क दशकांचा इतिहास असलेला पक्ष शिंदेंना बहाल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतही अशाच काही घडामोडी घत आहेत. त्याचा घटनाक्रम पाहिला तर निवडणूक आयोगाच्या मनात नेमके काय सुरु आहे याबाबत उत्सुकता आहे.
उद्धव ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदे गट यांच्यातील लढाईमध्ये निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. ज्याला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पुढची तारीख दिल्याने प्रकरण न्यायप्रविष्ठ असून प्रलंबीत राहिले आहे. पुढच्या सुनावणीत काय होते याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतही असेच काहीसे घडण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने काहीही निर्णय दिला तरी एक गट हा सर्वोच्च न्यायालयात जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
दरम्यान, एकूण घटनाक्रम पाहिला तर अजित पवार गटाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालून बाजूला होत भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तो दिवस होता 2 जुलै. अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. पहिल्या दणक्यातच अजित पवार यांनी स्वत:सह आपल्या नऊ सहकाऱ्यांसोबत थेट मंत्रीपदाचीच शपथ घेतली. राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व घटना घडली. ज्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. भविष्यातही उमटत राहतील. दरम्यान, अजित पवार यांच्या वर्तनाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला. ज्यामुळे आयोगाने पहिली सुनावणी घेऊन पुढच्या सुनावणीसाठी 6 ऑक्टोबर ही तारीख दिली. जी आज आहे. त्यानुसार या प्रकरणाची आज सुनावणी पार पडत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शरद पवार आणि अजित पवार गटाने परस्परविरोधी दावे केले आहेत. अजित पवार गटाचा दावा आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. तर तो दावा शरद पवार गटाने फेटाळून लावत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट पडली नसल्याचे म्हटले आहे. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्णय घ्यायचा आहे.