Operation Lotus vs. Operation watch: भाजपच्या 'मेगा भरती' विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 'मिशन घड्याळ'; अजित पवार यांचे सूचक वक्तव्य

जे लोक आमच्याकडे येतील त्यांना केवळ पक्ष प्रवेश देऊनच थांबवले जाणार नाही. तर ते निवडणुकीस उभे राहिले तर त्यांना महाविकासआघाडीचा उमेदवार म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा पाठिंबा मिळेल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

NCP vs. BJP | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सत्ता काळात भारतीय जनता पक्षाने (BJP) ज्या पद्धतीने आक्रमक राजकारण केले. त्याच पद्धतीने त्याला आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने जवळपास नक्की केले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात भाजपच्या ऑपरेशन लोटस (Operation Lotus) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ऑपरेशन वॉच (Operation Watch) पाहायला मिळू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले. अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी म्हटले आहे की, येणाऱ्या काळात विरोधी पक्षातून जे कोणी महाविकासआघा़डीकडे येतील त्यांचे स्वागत केले जाईल. इतकेच नव्हे तर जे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले आहेत त्यांनाही पक्षात परत घेतले जाईल. जे लोक आमच्याकडे येथील त्यांना केवळ पक्ष प्रवेश देऊनच थांबवले जाणार नाही. तर ते निवडणुकीस उभे राहिले तर त्यांना महाविकासआघाडीचा उमेदवार म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा पाठिंबा मिळेल. आणि महाविकासआघाडीचा उमेदवार म्हणूनच तो उमेदवार निवडूणही आणला जाईल. (हेही वाचा, BJP Leaders Demands Chandrakant Patil's Resignation: चंद्रकांत पाटील राजीनामा द्या, भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी)

दरम्यान, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑपरेशन वॉच बद्दल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उगाचच दिशाभूल करु नये. त्यांनी थेट आव्हान द्यावे की, विशिष्ठ तारखेपर्यंत आम्ही भाजपतील इतके आमदार फोडू. अथवा त्यांना आमच्या पक्षात प्रवेश देऊ. तसे करुन दाखवावे अन्यथा राजीनामा द्यावा आणि मोकळे व्हावे. उगाचच वक्तव्ये करत बसू नये, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, भाजपचे 105 आमदार आहेत. शेवटपर्यंत या आमदारांची संख्या 105 इतकीच राहिली. विरोधकांनी कितीही आव्हान देऊ देत भाजप घाबरत नाही. आमची ताकद तेवढीच कायम आहे. आमचे आमदार कधीच फुटू शकत नाहीत.