राष्ट्रवादीच्या खासदारांना Air India विमानप्रवासात ऑम्लेटमध्ये आढळले अंड्याचे कवच; एयर इंडिया कडून ठेकेदाराला शिक्षा
या दरम्यान नाश्त्यासाठी त्यांनी ऑम्लेट मागवले होते. त्या ऑम्लेटमध्ये चक्क अंड्याच्या कवचाचे तुकडे आढळून आले आहेत.
बाहेरच्या खाद्य पदार्थांमध्ये अनेकवेळी आळ्या, कीटक, बुरशी आढळून आल्याचे धक्कादायक प्रकार घडले आहे. आता असाच एक प्रकार चक्क राष्ट्रवादीच्या (NCP) राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण (Vandana Chavan) यांच्यासोबत घडला आहे आणि तोही चक्क विमानप्रवासात. 5 ऑक्टोबर रोजी वंदना चव्हाण एयर इंडियाच्या विमानाने पुणे –दिल्ली असा प्रवास करत होत्या. या दरम्यान नाश्त्यासाठी त्यांनी ऑम्लेट मागवले होते. त्या ऑम्लेटमध्ये चक्क अंड्याच्या कवचाचे तुकडे आढळून आले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून चव्हाण यांनी या घटनेची माहिती दिली.
इतकेच नाही तर, बटाट्याचे तुकडे कुजलेले होते, बीन्स पूर्णतः शिजलेले नव्हते, जामच्या जारमध्ये कसलीशी भुकटी होती. वंदना चव्हाण यांनी या प्रकरणाची तक्रार एयर इंडियाकडेही केली होती. वंदना चव्हाण यांची तक्रार आणि घडलेल्या प्रकारची दखल घेत एअर इंडिया प्रशासनाने संबधित ठेकेदाराला दंड ठोठावला आहे. तसेच या प्रकाराबद्दल माफी मागत पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची ग्वाही दिली आहे.
वंदना चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये एअर इंडिया, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, डीजीसीए आणि नागरी विमान उड्डाण मंत्रालयाला टॅग केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची दाखल एयर इंडियाला ग्यावीच लागली. एयर इंडियाने ठेकेदाराला हँडलिंग चार्जेस आणि संपूर्ण फ्लाईटच्या खाद्यपदार्थाची रक्कम देण्याचा दंड ठोठावला आहे.