राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांची महाराष्ट्र विधानसभेचे नवे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती
यापूर्वी भाजपचे आमदार कालिदास कोलंबकर यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) हे महाराष्ट्र विधानसभेचे नवे हंगामी अध्यक्ष (Pro-Tem Speaker) असणार आहेत. यापूर्वी भाजपचे आमदार कालिदास कोलंबकर यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. दिलीप वळसे पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे एक नावाजलेले नाव आहे, तसेच ते राज्य विधानसभेचे सभापती देखील राहिले आहेत. स्पीकर व्यतिरिक्त ते राज्यातील ऊर्जा, अर्थ आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री देखील राहिले आहेत. पाटील हे शरद पवारांचे अगदी जवळचे मानले जातात.
दिलीप वळसे-पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. यावेळी निवडून येण्यापूर्वी ते 5 वेळा आमदार राहिले आहेत. यावेळी ते सलग सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधिवत आपला पदभार स्वीकारला. त्यांनी गुरुवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उद्या सकाळी कामकाज सुरु झाल्यावर नव्या हंगामी अध्यक्षांची घोषणा केली जाणार, त्यानंतर मंत्र्यांचा परिचय होणार. परियचानंतर विरोधी पक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक केली जाणार आहे. (हेही वाचा: मेट्रोला नाही तर, आरे कारशेडच्या कामाला स्थगिती- उद्धव ठाकरे)
महाविकास आघाडीच्या सरकारच उद्या दुप्पारी 2 वाजता बहुमत चाचणी होणार आहे. त्यामुळे आता शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे सरकार शनिवारी फ्लोअर टेस्ट देण्याची तयारी करत आहे. फ्लोअर टेस्ट करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, उपमुख्यमंत्रीपदावरून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधील मतभेद वाढले आहेत. मात्र tv 9 मराठीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाळासाहेब थोरात हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.