राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून पुढील दोन दिवस कोकण दौऱ्यावर
निसर्ग चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा शरद पवार यांच्याकडून घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्रात 3 जूनला धडकलेल्या निसर्ग (Nisarga Cyclone) चक्रीवादळामुळे फार मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. खासकरुन रायगड जिल्ह्याला याचा सर्वाधिक फटका बसला असून तेथील नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. अशीच परिस्थिती पुणे, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग येथे सुद्धा उद्भवली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील नागरिकांना तातडीची मदत सुद्धा राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे उद्यापासून (9 जून) पुढील दोन दिवस कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा शरद पवार यांच्याकडून घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
शरद पवार हे उद्या प्रथम रायगड जिल्ह्याला भेट देणार असून तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्याचसोबत रायगड मध्ये प्रशासनाकडून सुरु करण्यात आलेल्या कामांबाबत सुद्धा शरद पवार माहिती घेणार आहे. त्यानंतर 10 जूनला रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असून निसर्ग चक्रीवादळामुळे फटका बसलेल्या ठिकाणी भेट देणार आहेत. तर शरद पवार यांचा दोन दिवसांचा कोकण दौरा संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांत्यासोबत सुद्धा निसर्ग चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती संदर्भात चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचसोबत नुकसान बसलेल्या क्षेत्रांना कशा पद्धतीने मदत करण्यात येईल याबाबत सुद्धा निर्णय घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे.(Nisarga Cyclone Update: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला तातडीची मदत केली जाहीर)
तर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्याला भेट दिली होती. तेथे निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानी बाबत दीड हजार कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली होती. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याला 75 कोटी आणि सिंधुदुर्गला 25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचसोबत अन्य ज्या ठिकाणी चक्रीवादळामुळे फटका बसला आहे तेथील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मदत जाहीर करण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.