'आता तू गाड्या वापरणं बंद केलंस की ट्विटर?' अक्षय कुमार याने इंधन दरवाढीवरुन 9 वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटवर जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
त्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी खिलाडी कुमार याला काही सवाल केले आहेत.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) पेट्रोल डिझेलचे (Petrol Diesel) दर तब्बल 82 दिवस स्थिर होते. लॉकडाऊनपूर्वी 16 मार्च रोजी इंधनाचे दर वाढले होते. त्यानंतर थेट 7 जून रोजी इंधनाच्या दरांमध्ये वाढ पाहायला मिळाली. त्यानंतर सातत्याने इंधनाचे दर देशभरात वाढत आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Awhad) यांनी अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याला टोला लगावला आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरुन अक्षय कुमार याने 16 मे 2011 रोजी एक ट्विट केलं होतं. त्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी खिलाडी कुमार याला काही सवाल केले आहेत. (Petrol, Diesel Price Hike: काढली आठवण.. दाखवले पोस्टर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा पंतप्रधान मोदी, भाजप प्रणित केंद्र सरकारला टोला)
तब्बल 9 वर्षांपूर्वी अक्षय कुमार याने ट्विट केलं होतं की, "मी रात्री माझ्या घरीसुद्धा जाऊ शकलो नाही, कारण इंधनाच्या किंमती पुन्हा रॉकेटप्रमाणे वाढण्याआधी संपूर्ण मुंबई पेट्रोलसाठी रांगा लावत होती." अक्षय कुमार याच्या या ट्विटवर जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. "आता तू ट्विटरवर अॅक्टीव्ह नाहीस का? तू आता कार वापरणं बंद केलंस का? तू आता वृत्तपत्रं वाचत नाहीस का? तुझ्या माहितीसाठी सांगतो सध्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे." असं ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय कुमार याला टॅग केलं आहे.
Jitendra Awhad Tweet:
आज सलग 19 व्या दिवशी पेट्रोल डिझेलचे दर वधारले आहेत. मुंबईत पेट्रोल डिझेलचे दर अनुक्रमे 86.70 रुपये प्रति लीटर आणि 78.34 रुपये प्रति लीटर इतके आहेत. दरम्यान देशातील इतर राज्यांमध्ये इंधनाचे दर एक्ससाईज ड्युटी किंवा टॅक्स यावरुन वेगवेगळे आहेत. पेट्रोल डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी इंधनाचे दर कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.