राज ठाकरे यांनी अजित पवार यांचे निमंत्रण स्वीकारल्यास महाराष्ट्रात राजकीय समीकरणं बदलणार

अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर अनेकदा जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तर, राज ठाकरे यांनी त्याला अत्यंत तीव्र शब्दांत आणि उपहासात्मक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. या दोन नेत्यांमधला कलगीतुरा महाराष्ट्राने पाहिला आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर वेगळी खेळी झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाला अनपेक्षितरित्या वेगळे वळण मिळू शकते.

Ajit Pawar and Raj Thackeray | (Photo credit: archived, edited, representative image)

केंद्र आणि राज्यातील सत्तेतून भारतीय जनता पक्षाला बाहेर ठेवण्यासाठी विरोधक जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यासाठी समविचारी आणि सेक्युलर विचारांवर विश्वास असणाऱ्या पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहेत. या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP leader Ajit Pawar) यांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनाच निमंत्रण दिले आहे. आगामी निवडणुकीत मतांचं विभाजन टाळण्यासाठी राज ठाकरे यांच्या मनसेनं आमच्यासोबत यावं, असं अजित पवार यांनी म्हटले आहे. आता या जाहीर निमंत्रणाचा राज ठाकरे यांच्याकडून कसा स्वीकार होतो याबाबत उत्सुकता आहे. परंतु, या निमंत्रणाचा स्वीकार झाल्यास राज्यातील राजकारणाची आणि खास करुन मुंबईच्या राजकारणाची समीकरणे बऱ्याच प्रमाणावर बदलतील हे नक्की.

अजित पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजकीय विषयांवर भूमिका व्यक्त केली. राज ठाकरे यांच्या मनसेला निमंत्रण देतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) पर्यायाने खा. राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यासोबत असलेले मतभेदही दूर करणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात विरोधकांनी चांगलेच रान तापवायला आणि रणनिती आखायला सुरुवात केली असल्याचे दिसते.

आजवर राष्ट्रवादी आणि मनसे यांचे नाते पाहिल्यास दोन्हीकडी पक्षनेत्यांनी एकमेकांवर येथेच्छ चिखलफेक केली आहे. अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर अनेकदा जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तर, राज ठाकरे यांनी त्याला अत्यंत तीव्र शब्दांत आणि उपहासात्मक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या अनेक भाषणांमधून राज ठाकरे यांनी अजित पवार यांची खिल्लीही उडवली आहे. या दोन नेत्यांमधला कलगीतुरा महाराष्ट्राने पाहिला आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर वेगळी खेळी झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाला अनपेक्षितरित्या वेगळे वळण मिळू शकते. (हेही वाचा, बारामती येथे भाजप पक्षाचे 43 व्या जागेवर कमळ फुलणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

दुसऱ्या बाजूला पदार्पणातच मोठे यश लाभलेल्या मनसेला गेल्या काही काळात बरीच उतरती कळा लागली. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आपले अस्तीत्व कायम राखण्याचे मोठे आव्हान पक्षनेतृत्वासमोर असणार आहे. या पार्श्वभूमिवर गेल्या काही काळात राज ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत उठबस चांगलीच वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते छगन भुजबळ यांनीही राज ठाकरे यांची अलिकडेच भेट घेतली होती. राज यांनीही आपल्या अनेक सभा, पत्रकार परिषदा आणि व्यंगचित्रांतून भाजप आणि खास करुन पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात टीकेची धार अधिकच तीव्र केली आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेचे नाते काय असेल याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.