मंत्री Eknath Shinde यांना नक्षलवाद्यांकडून धमकीचे पत्र; सुरक्षेत केली वाढ
नोव्हेंबर 2021 मध्ये गडचिरोलीमध्ये पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या मिलिंद तेलतुंबडे याच्यावर 50 लाखांचे बक्षीस होते. मिलिंद तेलतुंबडे हा भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी होता. गडचिरोली चकमकीत ठार झालेल्या 26 नक्षलवाद्यांपैकी सहा महिला, 20 पुरुष नक्षलवादी आहेत
महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पुन्हा धमकीचे पत्र मिळाले आहे. राज्यातील गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात कथितपणे झालेल्या नक्षलवाद्यांच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी धमकी देणारे हे पत्र आहे. हे पत्र शुक्रवारी ठाणे आणि गडचिरोलीचे पालकमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले होते, त्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली. जिल्हा अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. त्यानंतर शिंदे म्हणाले की, गडचिरोलीतील नक्षल समस्या सोडवण्यासाठी विकास हाच एकमेव मार्ग आहे.
या पत्रावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, गडचिरोली हा नक्षलवाडी भाग आहे. या ठिकाणी आमचे पोलीस आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. या भागाचा सर्वांगीण विकास झाला तरच इथल्या नक्षलवादी कारवाया थांबू शकतील. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्यांच्या एका प्रमुख कमांडरसह 26 नक्षलवादी ठार झाले होते.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, धमकीच्या पत्राबाबत ठाणे पोलिसांना मिळालेली तक्रार तपासासाठी गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली आहे. याआधीही अशा धमक्या आल्या होत्या, असे एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री पत्रकारांशी बोलताना सांगितले. गडचिरोलीचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याचा कारभार पाहणे हे आपले कर्तव्य आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून मुख्य प्रवाहात आणणे हेच आमचे ध्येय आहे. या भागातील नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास हा एकमेव मार्ग असल्याचे शिंदे म्हणाले.
नोव्हेंबर 2021 मध्ये गडचिरोलीमध्ये पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या मिलिंद तेलतुंबडे याच्यावर 50 लाखांचे बक्षीस होते. मिलिंद तेलतुंबडे हा भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी होता. गडचिरोली चकमकीत ठार झालेल्या 26 नक्षलवाद्यांपैकी सहा महिला, 20 पुरुष नक्षलवादी आहेत. नक्षलवाद्यांकडे पाच एके-47 सह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला. चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये तेलतुंडेचा एक पुरुष आणि एक महिला अंगरक्षकही सामील होता.
(The above story first appeared on LatestLY on Feb 13, 2022 05:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

