Antilia Bomb Scare Case: अँटिलिया स्फोटक प्रकरणी नवाब मलिक यांचा सूचक इशारा म्हणाले, 'आणखी धक्कादायक माहिती बाहेर येणार'
अँटिलिया स्फोटक प्रकरणी सचिन वाझे आणि त्याच्यासोबतच इतरही आणखी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलिया (Antilia) बाहेर ठेवण्यात आलेल्या जिलेटीनच्या कांड्या प्रकरणी राज्यातील मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा सूचक वक्तव्य केले आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरणी (Antilia Bomb Scare Case) सचिन वाझे ( Sachin Vaze) आणि त्याच्यासोबतच इतरही आणखी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे. या चौकशीनंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर येणार असल्याचा दावा, नवाब मलिक यांनी केला आहे. ते पुणे येथे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
अँटिलिया बाहेर स्फोटकं ठेवण्याचे काम सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनीच केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी आरोप केला आहे. हा सर्व प्रकार केवळ राजकीय हेतुनेच झाला असल्याचे सांगत मलिक पुढे म्हणाले, या दोघांनीही सरकारला चुकीची माहिती दिली. या प्रकरणात एका व्यक्तीची हत्या केल्यानंतरही ते राज्य सरकारला चुकीची माहिती देत होते. या सर्व प्रकरणानंतर परमबीर सिंह यांची होमगार्ड विभागात बदली केली. त्यानंतर त्यांनी इमेलद्वारे तक्रार केली. एकूणच हा विषय केवळ राजकीय हेतुने प्रेरित होता. चांदीवाल आयोग या सर्व प्रकरणाची चौकशी करत आहे. चौकशीनंतर अहवालात सत्य परिस्थिती बाहेर येईल, असेही मलिक म्हणाले. (हेही वाचा, Nawab Malik Bail: माझगाव दंडाधिकारी न्यायालयाकडून नवाब मलिकांना 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर)
सचिन वाझे याने एक पाकिस्तानी पासपोर्ट बनावटरित्या बनवल्याचा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे. आज ना उद्या आणखी एक धक्कादायक माहिती पुढे येणार असल्याचेही मलिक म्हणाले. एका अगदीच क्षुल्लक गुंडाच्या नावे एक बनावट पासपोर्ट बनविण्यात आला. हा पासपोर्टही अँटिलिया प्रकरणातच बनविण्यात आला होता. या पासपोर्टवर हा व्यक्ती पाकिस्तानचा एक्झिट-एंटर असल्याचे दाखविण्यात आले होते. वाझे आणि परमबीर या दोघांनी मिळून हा पासपोर्ट तयार केला होता. तसेच, या प्रकरणात मनसूख हिरेन शरण येण्यासाठी तयार होता. दरम्यान, त्याचा फेक एन्काउंटर करण्याचा प्लान परमबीर सिंह आणि वाझे यांनी आखला. वाझेच्या घरुन एनआयएला तो फेक पासपोर्ट मिळाला असल्याचा दावाही मलिक यांनी केला. एनआयएने ही माहिती उघड करावी, असे अवाहनही मलिक यांनी या वेळी केले.