नवी मुंबई: रस्त्यात उघड्यावर पडलेल्या विद्युत तारेवर पाय पडताच उडाला आगीचा भडका, तरुण गंभीर जखमी

तर ज्या तरुणाचा पाय या वायरवर पडताच क्षणी त्यामधून आग बाहेर येत त्याचे पाय त्यामध्ये होरपळले गेले आहेत.

Screengrab of the CCTV footage | (Photo Credits: YouTube/Screengrab)

इलेक्ट्रिक वायर्समधून विजप्रवाह सुरु करण्यात आलेला असतो. मात्र काही ठिकाणी विजपुरवठा करणाऱ्या वायर्स खुल्या सोडल्याचे दिसून येते. परंतु अशा वेळी एखाद्या व्यक्तीचा स्पर्श या वायर्सला झाल्यास विजेचा धक्का लागून जीव जाण्याची शक्यता फार असते. असाच एक प्रकार नवी मुंबई (Navi Mumbai) येथे घडला असून उघड्यावर पडलेल्या एका वायरवर चुकून पाय पडल्याने अचानक त्या वायरचा स्फोट झाला. तर ज्या तरुणाचा पाय या वायरवर पडताच क्षणी त्यामधून आग बाहेर येत त्याचे पाय त्यामध्ये होरपळले गेले आहेत.

मुंबई मिरर यांनी दिलेल्या वृत्तानुसार,  कौपरखैराणे परिसरात हा सर्व प्रकार घडला असून शुभम असे तरुणाचे नाव आहे. शुभम हा कौपरखैराणे येथील सेक्टर पाच या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होता. मात्र रस्त्यात उघड्यावर पडलेल्या वायरवर त्याचा नकळत पाय पडल्याने स्फोट होऊन आग लागली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

शुभमने घातलेल्या पॅन्टला आग लागत त्याचे पाय भाजले गेले आहेत. या दुर्घटनेप्रकरणी शुभम याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहेत. मात्र घडलेल्या या प्रकारामुळे वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या बाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच या लोकांच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात असल्याचे अन्य नागरिकांकडून म्हटले जात आहे.(मुंबई: पाण्यात खेळणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना विजेचा धक्का लागून मृत्यू)

तर गणपती विसर्जनावेळी सुद्धा नवी मुंबई येथे चार जणांना विजेचा धक्का लागल्याची घटना घडली होती. या प्रकरणी राजे शिव छत्रपती गणेश मंडळ यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती.