महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती ऑफर: शरद पवार यांचा गौप्यस्फोट
शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत (PM Narendra Modi) झालेल्या दिल्लीमधील भेटीत त्यांना महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याची ऑफर मिळाली होती मात्र ती आपण नाकारली असा खळबळजनक खुलासा केला आहे.
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतरसुमारे महिन्याभरानंतर सत्ता स्थापन करण्यात आली. दरम्यान महिन्याभराच्या कालावधीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकीय उलथापालथ होत होती. यामध्येच शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत (PM Narendra Modi) झालेल्या दिल्लीमधील भेटीत त्यांना महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याची ऑफर मिळाली होती मात्र ती आपण नाकारली असा खळबळजनक खुलासा पवारांनी एबीपी या वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये केला आहे. शरद पवार यांनी दाखला देताच शिवसेनेला पाठिंबा देण्यास सोनिया गांधी झाल्या राजी, उलघडलं गुपीत.
दिल्लीमध्ये शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळावरून चर्चा झाली. त्यावेळेस शेतकर्यांचे प्रश्न, नुकसान भरपाई बाबत चर्चा झाल्यानंतर शरद पवारांना थांबण्यास नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्यावेळेस राज्यातील सत्ताकोंडी फोडण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रवादी पक्षाने एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी असा प्रस्ताव ठेवला होता. मात्र शरद पवारांनी मोदींची ही ऑफर धुडकावत 'आपले व्यक्तिगत संबंध उत्तम आहेत. ते भविष्यातही राहतील मात्र राजकीय दृष्ट्या एकत्र येणं जमणार नाही.' आपले राजकीय अजेंडे वेगळे आहेत असे स्पष्ट केल्याचे शरद पवारांनी मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
शरद पवार -मोदी भेटीसोबतच या मुलाखतीमध्ये त्यांनी राज्यातील राजकीय नाट्यामागील कहाणी, अजित पवार यांचे बंड, सोनिया गांधींची मनधरणी याबाबतही चर्चा केली. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यास तयार नव्हते. मात्र शरद पवारांनी त्यांच्या भाषेत आदेश देत महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्त्वाची जबाबदारी दिल्याचं त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षांनी एकत्र येऊन महा विकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. 28 नोव्हेबरच्या संध्याकाळी शिवाजी पार्कवर भव्य शपथविधी सोहळा पार पडला. मात्र अद्याप खातेवाटप झालेले नाही. लवकरच त्याची देखील घोषणा होणार आहे.