स्मार्ट फोन नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण सुरु ठेवण्यात मदत करणाऱ्या नाशिकच्या कम्युनिटी रेडिओ केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार

जिल्हा परिषद आणि नाशिक महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या अंतर्गत ध्वनिमुद्रित व्याख्याने प्रसारित करण्यात आली आणि त्यांना सहज उपलब्ध करून देण्यात आली.

Nashik’s Community Radio Station | PC: PBI

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्काराच्या 8 व्या आवृतीत महाराष्ट्रातील नाशिक येथील रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ स्टेशनने (सीआरएस) दोन पुरस्कार मिळवले आहेत. कोविड -19 च्या काळात रेडिओ विश्वास 90.8 ने “शाश्वत मॉडेल पुरस्कार” श्रेणीत पहिला आणि “संकल्पना आधारित पुरस्कार” श्रेणीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. .

महाराष्ट्रातील नाशिकच्या विश्वास ध्यान प्रबोधिनी आणि संशोधन संस्थेद्वारे रेडिओ विश्वास केंद्र चालवले जात असून 2011पासून त्याचे प्रसारण होत आहे. या केंद्राचे दररोज 14 तास प्रसारण सुरु असते. 'शिक्षण सर्वांसाठी ' संकल्पना श्रेणी अंतर्गत पुरस्कार जिंकलेल्या 'शिक्षण सर्वांसाठी ' या सीआरएस(कम्युनिटी रेडीओ सर्विस ) उपक्रमाची सुरुवात जून 2020 मध्ये करण्यात आली . कोविड -19 च्या कठीण काळात इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याच्या उद्देशानेहा उपक्रम सुरू करण्यात आला.

जिल्हा परिषद आणि नाशिक महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या अंतर्गत ध्वनिमुद्रित व्याख्याने प्रसारित करण्यात आली आणि त्यांना सहज उपलब्ध करून देण्यात आली. हा कार्यक्रम हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत अशा विविध भाषांमध्ये प्रसारित करण्यात आला होता.

कम्युनिटी रेडिओचे कामकाज आणि दृष्टिकोन याबाबत रेडिओ केंद्राचे संचालक डॉ. हरी विनायक कुलकर्णी म्हणाले की, या कार्यक्रमाला अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला . “ही मुले गरीबीच्या विळख्यात अडकली आहेत आणि डिजिटल शिक्षणासाठी स्मार्ट फोन घेणे त्यांना परवडत नाही. आमच्या स्टुडिओमध्ये 150 शिक्षकांच्या मदतीने व्याख्याने ध्वनिमुद्रित करून ‘शिक्षण सर्वांसाठी ’ प्रकल्प राबवण्यात आला. त्यानंतर प्रत्येक विषयासाठी देण्यात आलेल्या वेळेनुसार ही व्याख्याने प्रसारित केली गेली. कार्यक्रमाला लक्ष्यित समुदायाकडून मोठा प्रतिसाद मिळाला; महानगरपालिका आणि जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे 50,000 - 60,000 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.

डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले की महाराष्ट्रातीलअन्य सहा कम्युनिटी रेडिओबरोबर ही व्याख्याने देखील सामायिक केली गेली आहेत, जेणेकरून ते देखील त्यांच्या रेडिओ वाहिन्यांद्वारे ती प्रसारित करु शकतील. “सहा कम्युनिटी रेडिओ केंद्रांनी आमच्याशी ही सामग्री आपापल्या शहरांमध्ये प्रसारित करण्यासाठी सामायिक करण्याबाबत संपर्क साधला , म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मदत करू शकलो याचे आम्हाला समाधान आहे.

डॉ. कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांना एफएम उपकरणे वितरीत करण्याच्या शिक्षकांच्या पुढाकारांविषयी देखील सांगितले. “नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील शिक्षकांच्या एका गटाने 451 एफएम उपकरणे (यूएसबी, ब्ल्यूटूथ, हाय-एंड स्पीकर्ससह) विद्यार्थ्यांना वितरित केली जेणेकरून सध्या सुरु असलेला अभ्यासक्रम त्यांना ऐकता येईल. त्यांचे नुकसान होणार नाही. शिक्षक ही व्याख्याने युट्यूबवर अपलोड करण्याचीही योजना आखत असून शालेय शिक्षण सामान्यपणे सुरू झाल्यावरही याचा वापर करता येईल. ”

“हे कार्यक्रम कायम लोकांसाठी उपलब्ध राहतील”

डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की सीआरएसने स्वीकारलेल्या शाश्वत नवसंशोधन मॉडेलमुळे आर्थिक, मानवी, तांत्रिक आणि आशय शाश्वती या चार प्रमुख क्षेत्रांमध्ये केंद्र तग धरू शकले आहे. दहा वर्षांच्या कालावधीत, या केंद्राने सुमारे 3 लाखाचा श्रोतृवर्ग निर्माण केला आहे, ते म्हणाले,“आम्हाला विश्वास आहे की आमच्या कार्यक्रमांद्वारे आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे सकारात्मक पावले उचलली जातील आणि बदल घडेल . ”.

सीआरएस (कम्युनिटी रेडीओ सर्विस ) मार्फत प्रसारित होत असलेल्या विविध कार्यक्रमांविषयी बोलताना ते म्हणाले की, शहरी परसबाग (किचन गार्डन) या कार्यक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता वाढण्यास मदत झाली. ते म्हणाले, “बियाणे उपलब्ध होण्यापासून त्याची रोप लागवड होईपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती या कार्यक्रमात आमच्या श्रोत्यांना दिली जाते,” ते म्हणाले. 'मला आवडलेले पुस्तक' (वाचायला आवडणाऱ्या पुस्तकांबद्दल) आणि 'जाणीव सामाजिकतेची ' (ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणा समस्यांवर केंद्रित ) कार्यक्रम विविध प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने करण्यात आले.

कम्युनिटी रेडिओ स्टेशन सामान्यत: 10-15 किलोमीटरच्या परीघ क्षेत्रातील स्थानिक समुदायाच्या फायद्यासाठी स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करतात. ही केंद्रे बहुतांश स्थानिक लोक चालवतात , त्यात टॉक शो बरोबरच स्थानिक संगीत आणि स्थानिक गाणे यांचा समावेश असतो.

कम्युनिटी रेडिओ केंद्राद्वारे नवकल्पना आणि निरोगी स्पर्धेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने माहिती व प्रसारण मंत्रालयाने वर्ष 2011-12 मध्ये राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ (सीआर) पुरस्कारांची स्थापना केली. या कम्युनिटी रेडिओ केंद्रांनी कोविड -19 महामारी दरम्यान संवाद घडवून आणण्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.सध्या देशातील विविध राज्यांमध्ये 327 कम्युनिटी रेडिओ कार्यरत आहेत.