Nashik: अहो आश्चर्यम! ठरल्या वेळेच्या 90 मिनिटांपूर्वीच आली ट्रेन; मात्र 45 प्रवाशांना न घेताच गेली निघून, Manmad येथील घटना
शिवराज मानसपुरे यांनी सांगितले की, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या चुकीने हा प्रकार घडला असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
समजा तुम्हाला ट्रेनने कुठेतरी जायचे आहे. तुम्ही आधीच तिकीट आरक्षण केले आहे. तुम्ही वेळेवर रेल्वे स्टेशनवर पोहोचता. प्लॅटफॉर्मवर थोडा वेळ थांबता आणि मग जेव्हा ट्रेन तिच्या वेळेत येत नाही तेव्हा चौकशी करता. त्यावेळी तुम्हाला सांगितले जाते की, ट्रेन 90 मिनिटे आधीच स्टेशनवर आली होती आणि 5 मिनिटे थांबल्यानंतर निघून गेली. हे ऐकल्यावर तुमची काय स्थिती होईल? असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रातील नाशिकमधील (Nashik) मनमाड (Manmad) जंक्शनवर घडला आहे.
मनमाड जंक्शनवर ट्रेनची वाट पाहत असलेल्या 45 प्रवाशांना जेव्हा कळले की, त्यांची ट्रेन 90 मिनिटे अगोदर स्थानकावर आली होती आणि पाच मिनिटांनंतर निघून गेली, तेव्हा त्यांना धक्काच बसला.
रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्लीकडे जाणारी वास्को द गामा-हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस वळविलेल्या मार्गाने गुरुवारी सकाळी 9.05 वाजता मनमाड स्थानकावर पोहोचली. या गाडीची मनमाड येथे येण्याची वेळ 10:35 आहे. मात्र ती नियोजित वेळेच्या 90 मिनिटे आधी मनमाड जंक्शनवर पोहोचली. गाडी पाच मिनिटे थांबली आणि 45 प्रवाशांना न घेताच मनमाड स्थानकातून निघून गेली. त्यानंतर त्रस्त प्रवाशांनी स्थानक व्यवस्थापक कार्यालयात जाऊन पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली. (हेही वाचा: Air India Flight Emergency Landing: दिल्लीहून पॅरिसला जाणारे विमान अर्ध्या तासात IGI वर परतले; 'या' कारणामुळे करण्यात आलं इमर्जन्सी लँडिंग)
अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रवाशांना गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बसवण्यात आले. मनमाड जंक्शनवर थांबा नसतानाही गीतांजली एक्स्प्रेस थांबवण्यात आली. पुढे या गाडीने प्रवासी जळगावला पोहोचले, तिथे गोवा एक्स्प्रेस रोखून धरण्यात आली. गोवा एक्स्प्रेस नियोजित वेळेपूर्वी मनमाडला पोहोचण्याचे कारण म्हणजे, तिचा बेळगावी-मिरज-दौंड मार्गाचा नियमित मार्ग बदलून रोहा-कल्याण-नाशिक रस्ता मार्ग करण्यात आला होता. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले की, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या चुकीने हा प्रकार घडला असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.