400 रुपये घेऊन बलात्कार प्रकरणातील संशयितांना सोडून दिले; दोन पोलीस निलंबित

या प्रकरणी या पोलिसांवर कडक कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी 400 रुपये घेऊन संशयितांना सोडल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक येथे घडला आहे. या प्रकरणी या पोलिसांवर कडक कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. कारभारी काकुळते आणि गोरख रेहरे अशी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. महिलेच्या नातेवाईकांनी यासंदर्भात ती बेपत्ता असल्याची तक्रार पंचवटी पोलीस ठाण्यात केली होती. त्याच रात्री पोलिसांनी या संशयितांना पकडलेही होते. हे प्रकरण मिटवण्यासाठी या पोलिसांनी 400 रुपयांची मागणी केली, त्यानंतर पैसे घेऊन संशयितांना सोडून दिले.

पंचवटीतील कर्णनगर परिसरात ही महिला रात्री दहाच्या सुमारास तांदूळ आणण्यासाठी बाहेर पडली होती. त्यावेळी पतीला जीवे मारण्याची धमकी देत, कल्याण उर्फ बाळू तायडे (24, हनुमाननगर) या रिक्षाचालकाने त्याचा मित्र दिगंबर उर्फ काळ्या विठोबा कुंदे (19, पेठरोड) याच्या मदतीने तिचे अपहरण केले. (हेही वाचा: मुलाचा कर्करोग बरा करून देण्याच्या बहाण्याने मांत्रिकाचा शास्त्रज्ञाच्या पत्नीवर बलात्कार)

त्यानंतर आधी मार्केट यार्डात व नंतर मखमलाबाद येथील एका नवीन बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान या महिलेच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली. पहाटे या दोघांनी महिलेला सोडून दिले. घडल्या प्रकाराबद्दल महिलेने दिलेल्या माहितीनुसार सकाळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षकांनी ही तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली, मात्र विश्वास नांगरे पाटील यांचे नाव घेताच ही तक्रार नोंदवली गेली.

ही महिला आदिवासी समाजाची असल्याने अट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्याच रात्री कारभारी काळकुते आणि गोरख रेहरे हे त्या रात्री मार्केट यार्ड परिसरात गेले होते. त्यांनी या संशयितांना महिलेसह पकडलेही होते. मात्र प्रत्येकी 400 रुपये घेऊन त्यांनी या दोघांना सोडून दिले होते. ही माहिती समोर येताच या दोघांना निलंबित करण्यात आले.