Nashik: Black Fungus च्या भीतीने चक्क परिसरातील झाडे तोडत आहेत लोक; जाणून घ्या नक्की काय आहे कारण

28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात काळ्या बुरशीच्या संसर्ग आढळून आला असून, महाराष्ट्र आणि गुजरात येथे सर्वाधिक रुग्ण आहेत.

काळ्या बुरशीची भीती (Photo Credit : ANI)

कोरोना विषाणूनंतर (Coronavirus) आता देशात ब्लॅक फंगस (Black Fungus) आजार हात-पाय पसरत आहे. काळ्या बुरशीची वाढती प्रकरणे लक्षात घेता अनेक राज्यांनी त्यास साथीचा रोग जाहीर केला आहे. सध्या भारतात 28,252 म्युकरमायकोसिसच्या (Mucormycosis) प्रकरणांची नोंद झाली आहे. 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात काळ्या बुरशीच्या संसर्ग आढळून आला असून, महाराष्ट्र आणि गुजरात येथे सर्वाधिक रुग्ण आहेत. आता या आजाराबाबत लोकांमध्ये एक नवीन भीती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये (Nashik) अशी काही प्रकरणे आढळली आहेत, जिथे काळ्या बुरशीच्या भीतीने लोक झाडे तोडत आहेत.

लोकांचा असा विश्वास आहे की आजूबाजूला झाडे असल्यास आर्द्रता वाढते, परिणामी बुरशीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते. म्हणूनच लोक झाडे तोडत आहेत. अशा परिस्थितीत वन विभाग लोकांचा हा भ्रम दूर करण्यासाठी पुढे आला आहे. नाशिक वनविभागाचे उप वनसंरक्षक पंकज गर्ग यांनी सांगितले की, या रोगाचा झाडाशी काही संबंध नाही. काळ्या बुरशीच्या आजाराच्या वाढीमागील कारण म्हणजे शरीरामधील प्रतिकारशक्ती कमी असणे हे आहे.

पंकज गर्ग यांनी निवेदनात म्हटले आहे की, काळ्या बुरशीच्या भीतीमुळे लोक झाडे तोडत असल्याचे ऐकले आहे. मी हे स्पष्ट करू इच्छित आहे की, या रोगाचा झाडाशी काहीही संबंध नाही. कमी प्रतिकारशक्ती, वारंवार स्टीम घेणे, एकच मास्क बराच काळ वापरणे आणि स्टिरॉइड्सचा दीर्घकाळ वापर यामुळे ब्लॅक फंगसचा संसर्ग होतो. महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात काळ्या बुरशीच्या संसर्गाची 6,384 प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि 523 लोकांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा: Monsoon in Mumbai: मान्सून मुंबईत उद्या दाखल होण्याची शक्यता! अनेक ठिकाणी 100 मीमी पेक्षा अधिक पावसाची नोंद)

दरम्यान, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये विदर्भात कोविडमुळे बरे झालेले 46 वर्षीय नवीन पॉल यांना दात आणि डोळ्याचा त्रास जाणवू लागला होता. पॉलयांच्यामध्ये ऑक्टोबरमध्ये काळ्या बुरशीची लक्षणे आढळली. त्यावेळी डॉक्टरांना हा संसर्ग नवीन होता. फेब्रुवारीमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि एक डोळा काढून टाकण्यात आला. पॉल यांनी त्यांच्या उपचारासाठी तब्बल 1.48 कोटी रुपये खर्च केले.