कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकर्‍याची कोंब आलेल्या कांद्याच्या ढिगार्‍यावरच आत्महत्या

योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्‍याने कांद्याच्या ढिगार्‍यावरच आत्महत्या केल्याची एक घटना नाशिकमधून समोर आली आहे.

Farmer Suicide| (Archived, edited, representative images) (Photo Credits: Facebook)

शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. मात्र एकेकाळी अभिमानाने 'जय जवान जय किसान' नारा दिल्या जाणार्‍या भारतामध्ये आता शेतकर्‍यांची दयनीय अवस्था झाली आहे. नैसर्गिक आपत्तीसमोर हतबल होऊन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचं अनेकदा वृत्तपत्रातून समोर आलं आहे मात्र योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्‍याने कांद्याच्या ढिगार्‍यावरच आत्महत्या केल्याची एक घटना नाशिकमधून समोर आली आहे.

कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने नाशिक येथील कंधा गावात ज्ञानेश्वर दशरथ शिवणकर या शेतकऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्या केली. कांद्याचं पीक आलं मात्र बाजारात त्याला भावच मिळेनासा झाल्याने साठवलेल्या कांद्यातून कोंब फुटायला सुरूवात झाली. कांदा पिकवूनही नुकसान होणार हे समोर असल्याने खचलेल्या ज्ञानेश्वर यांनी विष प्राशन करून जीव दिला.

कांद्याचे भाव कमी झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे कांद्याला भाव मिळत नसल्याने नाराज शेतकर्‍याने तुटपुंजी मिळकत मनी ऑर्डरच्या मार्फत मोदी सरकारला पाठवली होती.