नाशिक येथे वाढत्या COVID19 च्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना सातच्या आत घरात जाण्याचे आदेश, विनाकारण फिरल्यास कारवाई होणार
राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, औरंगाबादसह अन्य जिल्ह्यात सुद्धा कोरोना व्हायरसचे थैमान पहायला मिळत आहे. याच कारणास्तव कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, औरंगाबादसह अन्य जिल्ह्यात सुद्धा कोरोना व्हायरसचे थैमान पहायला मिळत आहे. याच कारणास्तव कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. याच दरम्यान आता नाशिक येथे सुद्धा कोरोना संक्रमितांचा आकडा शंभर ते सव्वाशेच्या सरासरीने वाढत आहे. यामुळेच नाशिकमध्ये आजपासून सायंकाळी 7 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या काळात विनाकारण घराबाहेर फिरताना दिसल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
नाशिक येथे संचारबंदीच्या वेळी फक्त जीवनावश्यक बाबींशी संबंधित व्यक्ती आणि रात्रीपाळीवरील औद्योगिक आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना परवानगी असणार आहे. मात्र या कर्मचाऱ्यांनी त्यांचे ओळख आणि कामाचे स्वरुप काय आहे त्याबाबत पोलिस अधिकांऱ्यांना सांगणे अनिवार्य असणार आहे. परंतु एखाद्या व्यक्तीने या संधीचा गैरफायदा घेतल्यास त्यावर ही कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी गर्दी ठिकाणी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचसोबत गर्दीच्या ठिकाणी नो व्हेइकल झोन सुद्धा जाहीर करण्यात आले आहेत.(मुंबई मध्ये आजपासून संचारबंदी लागू; रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत बाहेर पडण्यास मज्जाव)
दरम्यान, नाशिक येथे कोरोनाचे एकूण 4226 रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 102 जणांचा आतापर्यंत बळी गेला असून 2127 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात आता अनलॉकची प्रक्रिया जरी सुरु झाली असली तरीही कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच राज्य सरकार सुद्धा कोरोनाच्या विरोधात सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे ही दिसून येत आहे.