Nashik Bus Accident: अपघातग्रस्त बस ओव्हरलोड आणि वेगात होती; बस अपघात प्रकरणात नाशिक पोलिसांची माहिती

या अपघातात 12 जण ठार तर 43 जण जखमी झाले आहे. लग्झरी स्लीपर बसला ट्रेलर ट्रक धडकून हा अपघात झाला होता. नाशिक पोलिसांनी ( Nashik City Police) या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Nashik Bus Accident |(Photo Credit - Twitter)

राज्यभर खळबळ उडवून दिलेल्या नाशिक (Nashik) येथील लग्जरी बस (Luxury Sleeper Bus) अपघाताची चौकशी अद्यापही सुरु आहे. या अपघातात 12 जण ठार तर 43 जण जखमी झाले आहे. लग्झरी स्लीपर बसला ट्रेलर ट्रक धडकून हा अपघात झाला होता. नाशिक पोलिसांनी ( Nashik City Police) या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिस तपासात आतापर्यंत पुढे आलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त अतिशय वेगात होती. तसेत, ती ओव्हरलोडही होती. त्यामुळे ती अपघातास कारण ठरल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, नाशिक पोलिसांनी ट्रेलर ट्रकच्या फरार चालकाला शनिवारी रात्री उशिरा अटक केली. पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात ट्रक चालक रामजी उर्फ ​​लवकुश यादव, बस चालक ब्रह्मा मनवर (मृत), दीपक शेंडे (मदतनीस, क्लिनर) यांचा समावेश आहे. ब्रह्मा मनवर यांच्यावर निष्काळजीपणा, बेदरकारपणे गाडी चालवणे आणि अतिवेगाने चालवणे असा आरोप आहे. (हेही वाचा, Nashik Bus Accident: नाशिक बस दुर्घटनेप्रकरणी ट्रक चालकास अटक तर दोघांवर गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरु)

नाशिक शहर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक पथक तयार करणार असल्याचे सांगितले. “स्थानिक डीसीपी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्याच्या झोनमधील अधिकाऱ्यांना नियुक्त करतील. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करू. बसची स्थिती, पासिंग, फिटनेस इत्यादी. आम्ही आधीच सर्व वाचलेल्यांचे जबाब नोंदवले आहेत,” असेही ते म्हणाले.

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर अपघाताच्या वेळी बस थांबलेली नव्हती, असे सांगतानाच वरिष्ठ पोलिसांनी सांगितले की, ज्या पद्धतीने दोन्ही वाहनांमध्ये टक्कर झाल्याचे पाहायला मिळते. त्यावरुन लक्षात येते की दोन्ही वाहने अतिशय वेगात होती. त्यामुळे दोन्ही वाहन चालकांना आपापल्या वाहनांवर नियंत्रण मिळवता आले नाही. परिणामी ब्रेकही लावता आला नाही. परिणामी दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. त्यानंतर बसने लगेचच पेट घेतला.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथून मुंबईला जाणाऱ्या या बसमध्ये बसण्याच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवासी होते. सुरुवातीच्या प्रवासी यादीनुसार यात 30 प्रवाशांची क्षमता होती, परंतु जखमी आणि मृतांच्या यादीवरून 53 ते 55 लोक प्रवास करत होते, असे दिसते.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बसला आग लागताच काही प्रवासी खिडक्यांमधून उडी मारुन पळून जाण्यात यशस्वी झाले. काही अडकले आणि भाजले. स्थानिकांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला माहिती दिली, त्यांनी मदतकार्य सुरू करून आग आटोक्यात आणली.