Ajit Pawar on Narayan Rane: 'त्यांचं त्यांना लखलाभ', नारायण राणे यांच्या विधानावर अजित पवार यांची प्रतिक्रिया
त्यांनी काहीही विधान केले तर त्यांचं त्यांना लखलाभ, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ते पुणे येथे बोलत होते.
नारायण राणे (Narayan Rane) हे केंद्राचे मंत्री आहेत. त्यांनी केंद्राचे काम करावे. आम्ही राज्यात आहोत. आम्ही राज्याचे काम करु. ते काय बोलतात काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष देण्याचे आमचे काम नाही. राज्यातील महाविकासआघाडी सरकार भक्कम आहे. त्यांनी काहीही विधान केले तर त्यांचं त्यांना लखलाभ, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुणे येथे बोलत होते. अजित पवार यांनी पुणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासासासंदर्भात एका बैठकीत विविध आमदार, खासदारांची मते जाणून घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केरळ आणि महाराष्ट्र सरकारला कोरोनाच्या काळात गर्दी टाळण्याचे अवाहन केले आहे. या अवाहनाबाबत विचारले असता अमित शाह यांचे म्हणने बरोबर आहे. परंतू, त्यांच्याच सरकारमधील महाराष्ट्रातील मंत्री जन आशीर्वाद यात्रा काढत आहेत. या यात्रेला होणारी गर्दी पाहता जर कोरोना व्हायरस संसर्ग वाढला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला. (हेही वाचा, Anil Deshmukh Gets 'Clean Chit: अनिल देशमुख यांना सीबीआयकडून क्लिनचिट? सोशल मीडियावर कागदपत्रे व्हायरल, वाचा सविस्तर)
दरम्यान, काहीही झाले तरी दहीहंडी घेणारच असे मुंबई भाजपच्या काही आमदारांनी म्हटले आहे. यावर बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, जनहीत आणि खास करुन कोरोना काळात सर्वांनीच कोरोना नियमांचे बंधन पाळायला हवे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे. राजकारण करायच्या वेळी आपण सर्वजण मिळून राजकारण करु, असे अजित पवार म्हणाले. तसेच, कोरोना निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करु असेही अजित पवार या वेळी म्हणाले.
पुणे शहरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्यामुळे येत्या काही काळात पुण्याला अधिक भक्कम आणि दीर्घकालीन सेवा उभारायला हव्यात. त्यासाठी आतापासूनच नियोजन करायला हवे, असेही अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीस पुणे जिल्ह्यातील आमदार आणि खासदार यांच्यासह प्रशासनाचेही काही अधिकारी उपस्थित होते.