Narayan Rane on Maratha Reservation: मराठा आरक्षण संदर्भात नारायण राणे यांच्याकडून मोठं वक्तव्य, 'सरसकट कुणबी दाखला ही 96 कुळींची मागणी नाही'
आरक्षणाविषयी बोलताना ज्यांचा इतिहासाचा अभ्यास आहे त्यांनीच बोलावे. तसेच ते देत असताना कोणत्याही प्रकारची द्वेशाची भावना असू नये, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मराठा आरक्षण संदर्भात एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. घटनेतील 15/4 चा राज्य सरकारने नीट अभ्यास करावा. महाराष्ट्रात मराठा समाज 38% आहे. सरसकट कुणबी दाखला ही 96 कुळी मराठा समाजाची मागणी नाही. मराठा समाचाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यांना आरक्षण द्यावे पण कोणाचे आरक्षण काढून ते त्यांना देण्यात येऊ नये. राज्यघटनेप्रमाणे कोणत्याही समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे. आरक्षणाविषयी बोलताना ज्यांचा इतिहासाचा अभ्यास आहे त्यांनीच बोलावे. तसेच ते देत असताना कोणत्याही प्रकारची द्वेशाची भावना असू नये, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही जोरदार टीका केली.
नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले की, मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांमध्ये ते मंत्रालयात जाऊ शकले नाहीत आणि आता महाराष्ट्रभर दौरे काढत फिरत आहेत. त्यांनी आगोदर चांगले बोलणे शिकावे. आपण बोलतो काय ते बोलत असताना राज्याच्या विकासात आपले योगदान काय हे तपासून पाहिले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे हे कधीही कोणाच्या घरी गेले नाहीत. राष्ट्रीय पातळीवरचे नेते त्यांना भेटायला येत असत. आता हे सर्वांना भेटत आहेत. उद्धव म्हणजे ठाकरे नावाला कलंक आहे, अशा तीव्र शब्दांत राणे यांनी टीका केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टरबूज म्हटले. पण देवेंद्र देखणे आहेत. उद्धव ठाकरे महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणी सभा घेऊन त्यांची पोलखोल करणार, असेही राणे म्हणाले. लंडनला काय आहे याबाबत आपण लवकरच एक पोलखोल करणार आहोत असा इशाराही राणे यांनी दिला.