शिवसेनेमुळे मुंबईमधून मराठी माणूस कमी झाला, 28 कंपन्यांमध्ये उद्धव ठाकरे भागीदार; नारायण राणे यांची टीका
28 कंपन्यांमध्ये रवींद्र वायकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाकरे घराण्यातील एका व्यक्तीची भागीदारी आहे.
आज रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी निवडणूक अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले, यावेळी पुन्हा एकदा नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेनेवर तोफ डागली. आज मुंबईमध्ये मराठी माणूस फक्त 18 टक्केच शिल्लक आहे याला शिवसेनाच जबाबदार आहे. 28 कंपन्यांमध्ये रवींद्र वायकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाकरे घराण्यातील एका व्यक्तीची भागीदारी आहे. सत्तेतून फक्त पैसेच कमवायचे ही शिवसेनेची नीती आहे असे आरोप नारायण राणे यांनी केले.
गेली पाच वर्षे शिवसेना भाजप पक्षावर टीका करत आलेली आहे. अमित शहांना अफजल खान म्हटले आणि आता त्यांचाच फॉर्म भरायला गांधीनंगरला गेले. शिवसेनेचा व्यवहार हा दुपट्टीपणाचा आहे. उपकार घ्यायचे, सत्तेचा फायदा उचलायचा ही त्यांची वृत्ती आहे. तसेच फॉर्म भारतानाची गर्दी पाहून, 23 मेच्या निकालाची वाट न पाहता आजच विजय झाल्यासारखा भासतेय. फ्रीज निशाणी घराघरात पोहचवा, परिवर्तन साध्य करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन राणे यांनी केले. (हेही वाचा: शिवसेना-भाजप युतीला 25 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत - नारायण राणे यांचे भाकीत)
याचवेळी त्यांनी विनायक राऊत यांच्यावरही कडाडून टीका केली. पाच वर्षात विनायक राऊतांनी केले काय? राऊतांनी 1 कोटींचे काम तरी केले का? असा सवाल नारायण राणे यांनी केला. राऊतांना धड हिंदी बोलता येत नाही. एसएससीला दोनदा नापास झालेल्या माणसाला लोकसभेत पाठवले ही लोकांची चूक आहे. अशा शब्दात राणे यांनी आपला राग व्यक्त केला.