Nanded Shocker: नांदेड मध्ये 10 वर्षीय मुलीची गळफास घेत आत्महत्या; आदिवासी आश्रम शाळेमधील घटना
या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
नांदेड (Nanded) मध्ये एका चौथी मध्ये शिकणार्या मुलीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या 10 वर्षीय मुलीने गळफास घेऊन जीवन संपल्याचं वृत्त समजताच नांदेड हादरलं आहे. ही घटना आदिवासी आश्रम शाळेमधील आहे. मुलींच्या वसतीगृहामध्ये हा आत्महत्येचा प्रकार समोर आला आहे. आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव विश्रांती देशमुखे आहे. हदगाव मधील केदारगुढा मध्ये असणार्या आदिवासी आश्रम शाळेत ती शिकत होती. काल 12 डिसेंबरच्या संध्याकाळी 5 च्या सुमारास विश्रांतीने आपल्या हॉस्टेलमध्ये दुमजली बेडवर ओढणीच्या सहाय्याने आत्महत्या केली. या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 वर्षीय मुलीच्या आत्महत्येचा हा प्रकार धक्कादायक आहे. सध्या या अत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही. मयत मुलीच्या कुटुंबाकडून मात्र पोलिस आणि वसतीगृहाचे संचालक हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आहेत. त्यांनी मुलीच्या आत्महत्येवर संशय व्यक्त केला आहे. तसेच आता पोस्ट मार्टम इन कॅमेरा करावं अशी मागणी केली आहे.
दरम्यान एका महिन्यापूर्वी याच वसतिगृहामध्ये अन्य एका मुलीने विष पिऊन आत्महत्या केली होती. या प्रकाराचा आता सखोल तपास व्हावा अशी मागणी केली जात आहे.
विश्रांती च्या अन्य 2 बहिणीदेखील याच वसतिगृहामध्ये राहतात. काल शाळा लवकर संपल्यानंतर ती खोलीवर गेली आणी नंतर तिच्या आत्महत्येचं वृत्त समजलं असं सांगण्यात आलं आहे. मनाठा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोस्टमार्टेम अहवालानंतर यामागे नेमकं काय कारण आहे, याचा उलगडा होऊ शकणार आहे.