लॉकडाऊन संदर्भात अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई; नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन, संचारबंदी केली जात आहे. तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन (Lockdown), संचारबंदी (Curfew) केली जात आहे. तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, या सगळ्यात अफवांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लॉकडाऊन संदर्भात चुकीचे संदेश पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नांदेडचे (Nanded) जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Dr. Vipin Itankar) यांनी दिली आहेत.

नांदेड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मात्र जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येत असल्याच्या बातम्या, संदेश व्हॉट्सअॅप, ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया माध्यमातून पसरवले जात आहेत. अशांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे इटनकर यांनी स्पष्ट केले आहे. (कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यूचा विचार सुरु- मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार)

कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेडमध्ये प्रशासन योग्य खबरदारी घेत आहे. जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असून आरोग्य विभागाकडून जनजागृतीही केली जात आहे. मात्र नागरिकांचे सहकार्यही अत्यंत मोलाचे आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सुरक्षित अंतर आणि सतत हात स्वच्छ करणे अथवा सॅनिटायजर वापरणे या त्रिसुत्रीचे पालन करणे आवश्यक आहे. नागरिकांनी या नियमांचे पालन केल्यास जिल्हा प्रशासनाला कठोर पावले उचलायची वेळ येणार नाही असंही इटनकर यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोना बाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आज अमरावतीमध्ये एक दिवसीय लॉकडाऊन करण्यात आला आहे. अकोला, नागपूर, वर्धा येथे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईसाठी देखील पालिकेने मेगाप्लॅन तयार केला आहे. पुण्यातील निर्बंधांबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार आहे.