Ajit Pawar On Nana Patekar: 'ना ना' म्हणत नाना पाटेकर यांचा अजित पवार यांना नकार; राष्ट्रवादीतर्फे शिरुरसाठी होता उमेदवारी प्रस्ताव

पण, त्यानंतर जाहीर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत म्हणजेच लोकसभा निवडणूक 2024 ध्ये उमेदवार शोधताना त्यांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यापासून ते थेट अभिनेता नाना पाटेकर यांच्यापर्यंत विचारणा करुन झाली आहे. दस्तुरखुद्द अजित पवार यांनीच ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

Ajit Pawar On Nana Patekar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Nana Patekar Candidature News: अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षात बंड करुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्ह तर मिळवलं. शरद पवार यांना बाजूला करुन ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षही झाले. पण, त्यानंतर जाहीर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत म्हणजेच लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) मध्ये उमेदवार शोधताना त्यांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यापासून ते थेट अभिनेता नाना पाटेकर यांच्यापर्यंत विचारणा करुन झाली आहे. दस्तुरखुद्द अजित पवार यांनीच ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. शिरुर लोकसभा मतदारसंघातून (Shirur Lok Sabha Constituency) शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकासआघाडीच्या वतीने विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित आहे. महायुतीच्या जागावाटपात ही जागा अजित पवार यांच्या पक्षाला मिळाली आहे. त्यामुळे या जागेवर कोल्हे यांना तोडीस तोड ठरेल असा कोणता उमेदवार द्यावा याबाबत दादा गटात विचारमंथन सुरु आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात उमेदवार शोधता शोधता अजित पवार चक्क नाना पाटेकर यांच्या पर्यंत पोहचले. पण त्यांनी नकार दिला. नाना पाटेकर यांनी 'ना ना' म्हटल्याने त्यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच रद्द झाली. दिलीप मोहिते यांच्या बंगल्यात पक्षाची एक बैठक आज सकाळी पार पडली या वेळी अजित पवारांनी ही माहिती दिल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. दरम्यान, आता या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्याचा विचार सुरु असल्याचे समजते. (हेही वाचा, Nana Patekar On PM Narendra Modi: येणार तर भाजपच, नाना पाटेकरांकडून PM मोदींचे तोंडभरून कौतुक)

नाना पाटेकर यांच्याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, शिरुर येथून उमेदवारीसाठी आपण त्यांना विचारले होते. मात्र, आपणास कल्पना आहेच नाना कसा माणूस आहे. त्यांनी आपल्या प्रस्तावाला नकार दिला. दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश द्यावा आणि शिरुरची उमेदवारी त्यांना द्यावी असा विचार आहे. असे घडल्यास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एक महत्त्वाचा नेता मित्रपक्षात दाखल होईल. तसेच, अमोल कोल्हे यांच्यासाठी सध्यातरी मैदान एकदम सोपे असल्याने काही प्रमाणात का होईना आव्हान तयार होऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (हेही वाचा, Srinivas Pawar on Ajit Pawar : 'आपण मरेपर्यंत आई-वडिलांना...; श्रीनिवास पवारांकडून अजित पवारांचा नालायक माणूस असा उल्लेख)

शिवाजीराव आढळराव पाटील यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी शिवसेना पक्षाकडून या मतदारसंघातून अनेकदा निवडणूक लढवली आणि जिंकली आहे. अपवाद फक्त लोकसभा निवडणूक 2014 चा या निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वात लढलेल्या अमोल कोल्हे यांनी आढळरावांना पराभूत केले. मात्र, त्या विजयात अजित पवार यांचा वाटा अधिक असल्याचे बलले जात आहे. आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर कोल्हे शरद पवार यांच्यासबत आहेत. परिणामी शिरुरच्या लढतीत कोणाचा विजय होतो याबाबत लवकरच कळणार आहे.