Nagpur Winter Session 2019: विधिमंडळामध्ये शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हणून फाडलं भाजपाचं बॅनर; पहा हाणामारीचं कारण काय?

त्यानंतर सभापती नाना पटोले (Nana Patole) यांनी मध्यस्थी करत हे कृत्य अशोभनीय असून संबंधित आमदारांना समज दिली आहे

Sanjay Gaikwad | Phot Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस देखील गदारोळाचा ठरला आहे. आजच्या दुसर्‍या दिवसाचे काम सुरू होताच सभागृहामध्ये शिवसेना आणि भाजपा आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि भाजपा आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) आज भिडले. त्यानंतर सभापती नाना पटोले (Nana Patole) यांनी मध्यस्थी करत हे कृत्य अशोभनीय असून संबंधित आमदारांना समज दिली आहे. तासाभराच्या कामकाजानंतर आज विधिमंडळाचे काम दिवसभरासाठी तहकूब झाले आहे. मात्र या प्रकारणावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आपली बाजू मीडियाशी बोलताना स्पष्ट केली आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज विधिमंडळाच्या कामकाजाला सुरूवात झाली तेव्हा विरोधकांनी गोंधळ घातला. हे अधिवेशन 5 दिवसांचे आहे. त्यामध्ये चर्चा करण्याऐवजी विरोधक वेलमध्ये आले. त्यांना शांत राहण्याचे आवाहन करून देखील विरोधक अध्यक्षांसमोर बॅनर घेऊन घोषणाबाजी करत होते. त्यामुळे आम्हांला बॅनर फाडावा लागला अशी भूमिका संजय गायकवाड यांनी मांडली आहे.

शेतकर्‍यांच्या मुद्द्यावरून आज विरोधक आक्रमक झाले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजार रूपये देण्याची मागणी केली आहे. दरम्यान पुरवणी मागण्यांमध्ये हेक्टरी 25 हजार रूपयांच्या तरतुदीचा उल्लेख नाही. त्यामुळे हे सरकार आत्ताच सत्तेमध्ये आले आहे आणि त्यांनी शेतकर्‍यांचा विश्वासघात केला असल्याचंही म्हटलं आहे.