नागपूर लोकसभा मतदारसंघ: नितीन गडकरी यांच्या होम पिचवर नाना पटोले विजयाचा सिक्सर मारणार का? लोकसभा निवडणूक 2019 - आव्हाने आणि जमेच्या बाजू
केंद्रात मंत्री. भाजपची मातृसंस्था म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालयही याच मतदारसंघात. त्यामुळे एकूण इतिहास आणि विद्यमान राजकीय स्थिती पाहता नागपूर लोकसभा मतदारसंघ हा देशातील हाय होल्टेज मदतारसंघ म्हणून गणला नाही तरच नवल. त्यामुळे गडकरी विरुद्ध नाना पटोले सामना रंगणारच
Lok Sabha Elections 2019: नागपूर लोकसभा मतदारसंघ (Nagpur Lok Sabha Constituency) हा सुरुवातीपासूनच काँग्रेस पक्षाचा (Congress) बालेकिल्ला. अपवाद फक्त आकराव्या आणि सोळाव्या लोकसभा निवडणुकीचा. या निवडणुकीत अनुक्रमे १९९६-९८ मध्ये बनवारीलाल पुरोहित आणि २०१४ मध्ये नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले. नाही म्हणायला एम.एस. अणे (M S Anae) आणि जाबुवंत धोटे (Jabuwant Dhote) यांनीही या मतदारसंघातून काँग्रेसच्या विजयाची परंपरा खंडीत केली. मात्र, हे दोन्ही उमेदवार तेव्हा अपक्ष लढून जिंकले होते. आता या मतदारसंघातून काँग्रेस पक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना मैदानात उतरवत आहे. खरेतर नाना पटोले हे भाजपचे खासदार. परंतू, मोदी सरकारची धोरणे न पटल्याचा आरोप करत त्यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप (BJP) सरकारमधील राजीनामा देणारे ते पहिले खासदार. तर, नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे भाजपचे नेते इथले (नागपूर) विद्यमान खासदार. केंद्रात राष्ट्रीय लोकशाही (NDA) आघाडी प्रणीत भाजपची सत्ता आहे. या सरकारमध्ये गडकरी हे मंत्री. त्यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक व जहाज मंत्रालयाचा कारभार आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजपची मातृसंस्था म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालयही याच मतदारसंघात. त्यामुळे एकूण इतिहास आणि विद्यमान राजकीय स्थिती पाहता नागपूर लोकसभा मतदारसंघ हा देशातील हाय होल्टेज मदतारसंघ म्हणून गणला नाही तरच नवल.
काँग्रेस उमेदवार नाना पटोले
काँग्रेस उमेदवार नाना पटोले हे एक राजकारणातील चर्चित नाव. राज्याच्या आणि देशाच्याही. मुळचे काँग्रेस पक्षातील. परंतू, काही राजकीय समिरणांमुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला. सत्तेसाठी सर्वांना प्रवेशाची दारे खुली ठेवणाऱ्या भाजपने त्यांना भंडारा-गोंदिया मतदारसंघातून तिकीट दिले. इथे ते विजयी झाले. त्यांचा हा विजय देशभरात गाजला. इथे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पहिल्या फळीचे नेते आणि माजी केंद्रीय विमानोड्डान मंत्री प्रफूल्ल पटेल यांचा पराभव केला. या विजयाचे बक्षीस म्हणून केंद्रात मंत्रीपद मिळेल अशी आशा पटोले आणि समर्थकांना होती. अर्थात ती प्रत्यक्षात उतरली नाही. पटोले केवळ खासदारच राहिले. मुळात पटोले यांचा पिंड बंडखोरीचा. त्यामुळे अल्पावधीतच ते भाजपमध्ये अस्वस्त झाले. भाजप प्रणीत मोदी सरकारची धोरणे त्यांना खटकू लागली. त्यांनी पक्षाच्या भर बैठकीत पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यावर प्रश्नांची बरसात केली. राजकीय विश्लेषकांनी या घटनेचे वर्णन नाना पटोले यांची भविष्यात राजकीय कोंडी होणार असे केले. पण, नाना पटोले यांनी तोपर्यंत वाटच पाहिली नाही. त्यांनी थेट खासदारकीचा राजीनामा दिला. तोही सरकारवर उघड टीका करुन. सरकारच्या धोरणांविरोधात टीका करुन मी राजीनामा दिला. पण, असा राजीनामा देणारा मी पहिला आमदार नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाना पटोले यांची उमेदवारी नागपूर लोकसभा मतदारसंगातूनच का?
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारस हा नाना पटोले यांचा मूळ मतदारसंघ. परंतू, लोकसभा निवडणूक 2019 ला सामोरो जाण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली. आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ रांष्ट्रवादीकडे गेला. त्यामुळे इथे काँग्रेसने उमेदवारी देण्याचा प्रश्नच नव्हता. दुसऱ्या बाजूला नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला तगडा उमेदवार हवा होता. जो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टक्कर देऊ शकेल. नाना पटोले यांच्या रुपात काँग्रेसला हा उमेदवार मिळाला.
नितीन गडकरी
नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. गडकरी हे मुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. संघाचे मुख्यालयही नागपूर. त्यामुळे तळागाळात असलेले संघ स्वयंसेवकांचे जाळे. तसेच, विद्यमान खासदार असल्याने आणि राजकारणाची सुरुवातच इथून झाल्याने मातृभूमी नागपूर हे गडकरीय यांच्यासाठी घरचे मैदान. कार्यकर्ते आणि नागरिकांशी असलेला प्रचंड लोकसंपर्क ही नितीन गडकरी यांची जमेची, महत्त्वाची बाजू. ही ताकद आणि वैशिष्ट्यांच्या जोरावरच गडकरी यांनी 2014 मध्ये नितीन गडकरी यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडून खेचून आपल्याकडे घेतला. या निवडणूकीत विलास मुत्तेमवार या तगड्या काँग्रेस नेत्याचा गडकरी यांनी मताधिक्याने पराभव केला. (हेही वाचा, मावळ लोकसभा मतदारसंघ: पार्थ पवार यांच्यासमोर लोकसभा निवडणूक 2019 मध्ये विजयासाठी ही आहेत आव्हानं)
नितीन गडकरींचे मुद्दे नाना पटोलेंचा संघर्ष: जमेचे मुद्दे
नितीन गडकरी हे आपली व्यक्तिरेखा विकासपुरुष अशी रेकाटण्यात बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत. रस्ते बांधणी, पर्यावरण आणि वेगवान नागरी प्रवासाला चालना ही त्यांचे आवडते विषय. त्यामुळे युती सरकारमध्ये राज्यात मंत्री असल्यापासून ते आता केंद्रात मंत्री असले तरी त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली 'पूलकरी' ही उपाधी त्यांनी कायम राखली आहे. आज देशात आणि नागपूरमध्येही रस्ते, महामार्गाचे जाळे उभारण्यात ते यशस्वी झाले आहेत. नागपूरमध्येही त्यांनी विविध विकासकामांना चालना दिली आहे. यात त्यांना देवेंद्र फडणवीस या नागपूरच्या तरुणाचा मुख्यमंत्री असण्याचाही फायदा मिळाला. दुसऱ्या बाजूला नाना पटोले यांनी नितीन गडकरी यांना नेहमीच लक्ष्य केले आहे. जाहीर भाषण असो की ट्विटर. नाना पटोले हे नेहमी भाजप सरकार आणि गडकरी यांच्यावर निशाणा साधत आले आहेत. गडकरी यांनी विकास केला परंतू त्याचा बाज हा शहरी आहे. ग्रामीण जनता ही गडकरींच्या अजेंड्यावर कधीच नसते. शेती, शेतकरी, कर्जममाफी आदी विषयांवर त्यांनी कधीच फारसे भाष्य किंवा काम केले नाही, असे पटोले सांगतात. महत्त्वाचे म्हणजे नाना पटोले आजवर कोणतीच निवडणूक पराभूत झाले नाहीत. त्यांना निवडणुका कशा जिंकायच्या याचा प्रदीर्घ अनुभव आहे. तसेच, थेट संघर्ष करण्याची वृत्ती पटोलेंची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे या वेळचा गडकरी विरुद्ध नाना पटोले हा सामना चांगलाच रंगणार असे दिसते.
नागपूर लोकसभा मतदारसंघ: विधानसभा मतदारसंघ आणि आमदार | ||
विधानसभा मतदारसंघ | आमदार | राजकीय पक्ष |
नागपूर दक्षिण पश्चिम (52) | देवेंद्र फडणवीस | भाजप |
नागपूर दक्षिण (53) | दिनानाथ पडोळे | काँग्रेस |
नागपूर पूर्व (54) | कृष्णा खोपडे | भाजप |
नागपूर मध्य (55) | विकास कुंभारे |
भाजप |
नागपूर पश्चिम (56) | सुधाकर देशमुख | भाजप |
नागपूर उत्तर (SC) (57) | डॉ. नितीन राऊत | काँग्रेस |
पटोले यांच्यासमोरील आव्हाने
नाना पटोले हे बाहेरचे उमेदवार आहेत. ते मुळचे नागपूरचे नाहीत. त्या उलट गडकरी हे भूमिपूत्र ठरतात, असा पटोलेंचे विरोधक आरोप करतात. काही लोक सांगतात की, पटोले यांच्याविरोधात नागपूरमधील दलित मतदारांमध्ये खदखद आहे. पटोले यांनी खैरलांजी प्रकरणात घेतलेली भूमिका दलितांना आवडणारी नव्हती. भंडारा गोंदीया मतदारसंघातील उमेदवार आमच्या माती का? असा सवाल नागपूरची जनता विचारु शकते. याचे योग्य आणि पटणारे उत्तर नाही देता आले तर पटोलेंसाठी आव्हान अधिक गडद होईल. तसेच, दुसऱ्या मतदारसंघातील आयात उमेदवार डोक्यावर घेऊन त्याचे काम आम्ही का करायचे असाही सवाल काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्याला पडू शकतो.
नितीन गडकरी यांच्यासमोरील अडचणी
नितीन गडकरी हे विकासाला चालना देणारे व्यक्तिमत्व आहे. तरीही त्यांना काही अडचणींचा सामना या मतदारसंघात करावा लागणार आहे. राजकीय विश्लेषक सांगताक की, गडकरी यांचे स्वभाववैशिष्ट्य ही सुद्धा त्यांच्यासाठी अडचण ठरु शकते. बैठक असो की जाहीर सभा. गडकरी रोखठोक बोलतात. बोलताना ते आपल्या विधानाचा अर्थ काय निघेल हे विचार करत नाहीत. त्यांचे निकटवर्तीय सांगतात की, खरेतर त्यांच्या मनात तसे काहीच नसते. पण, त्यांच्या वक्तव्याने चर्चा आणि वादाला कारण मिळाले आहे. 'अच्छे दिन हे गळ्यात अडकलेल्या हड्डीसारखे आहे', 'कामे करा नाहीतर जनता धडा शिकवते', 'शांत बसा नाहीतर ठोकून काढेन' (वेगळ्या विदर्भाष्या घोषणांच्या पार्श्वभूमिवर) , अशी काही त्यांची नुकतीच केलेली विधाने. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर भूमिका काय याचेही उत्तर गडकरींना द्यावे लागणार आहे. कारण, 6 मार्च रोजी नागपूर येथे झालेल्या एका सभेत काही कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा दिल्या. त्यावर भाषणादरम्यान, शांत बसा नाहीतर ठोकून काढेन, असे गडकरी म्हणाले. त्यामुळे अशा काही अडचणींचा सामना गडकरी यांनाही करावा लागणार आहे.