Nagpur: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांची आई मुक्त बोबडेंची कोट्यावधी रुपयांची फसवणूक; आरोपीला अटक

त्यानंतर मंगळवारी बोबडे यांनी घोष व इतरांविरुद्ध सीताबर्डी पोलिसात लेखी तक्रार दिली.

Arrest | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शरद बोबडे (Sharad Bobde) यांची आई मुक्ता बोबडे (Mukta Bobde) यांची दोन कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणात नागपूरच्या (Nagpur) सीताबर्डी पोलिसांनी तापस घोष (Tapas Ghosh) नावाच्या व्यक्तीला मंगळवारी रात्री अटक केली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी टाईम्स ऑफ इंडियाला आरोपीच्या अटकेची पुष्टी केली. बोबडे कुटुंबाचा स्वतःचा असलेला लॉन सांभाळणे व त्याच्या उत्पन्नाचा हिशोब ठेवण्याचे काम तापस घोष आणि त्याच्या पत्नीकडे होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाशवाणी स्क्वेअर येथे बोबडे कुटुंबाच्या स्थावर संपत्तीवर 'सीझन लॉन' नावाचा एक लॉन आहे. बोबडे यांनी सुमारे 10 वर्षांपूर्वी घोष या व्यक्तीला लॉनची काळजी घेणे तसेच त्याची देखरेख ठेवण्यासाठी नेमले होते. हा लॉन लग्न समारंभ किंवा तत्सम समारंभांसाठी भाड्याने दिला जात होता. मात्र मुक्ता यांचे वय झाल्याचा फायदा घेत, घोष आणि त्याची पत्नी यांनी या लॉनच्या उत्पन्नातून मिळणारी संपूर्ण रक्कम बोबडे कुटुंबाला दिली नाही.

काही कालावधीपूर्वीच मुक्ता बोबडे यांच्या लक्षात आले की, घोष त्यांना फसवत आहे आणि बर्‍याच वर्षांपासून मिळालेल्या भाड्याच्या पैशांमध्ये तो फेरफार करत आहे. त्यानंतर मंगळवारी बोबडे यांनी घोष व इतरांविरुद्ध सीताबर्डी पोलिसात लेखी तक्रार दिली. एफआयआरच्या आधारे पोलिसांनी तापस घोष याला आयपीसीच्या संबंधित कलमान्वये अटक केली. चौकशीदरम्यान घोष दाम्पत्याने आर्थिक गैरव्यवहार केल्याची कबुली दिली. सीताबर्डी पोलिस तापस घोषला कोठडी सुनावणीसाठी न्यायालयात हजर करतील, अशी माहिती सीपीने दिली. (हेही वाचा: फेसबुकवरून ओळख झालेल्या मुलीकडून तब्बल 1 कोटी 43 लाखांची फसवणूक; तरुणाची पोलिसात धाव)

दरम्यान, मागच्या वर्षी सेवानिवृत्त सरन्यायाधीश (सीजेआय) आरएम लोढा यांची हॅकर्सनी एक लाख रुपयांची फसवणूक केली होती. आरोपींनी लोढा यांचे मित्र सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी.पी. सिंह यांचा मेल आयडी हॅक करून लोढा यांना वैद्यकीय इमर्जेन्सीच्या नावाखाली मदत मागितली होती.