Nagpur Crime: नागपूरात वृद्ध महिलेची गळा चिरुन निर्घृण हत्या, पोलिसांनकडून आरोपींचा तपास सुरु
मारेकऱ्यांनी घरात घुसून वृद्ध देवकी बोबडे यांचे दोन्ही हात खुर्चीला बांधून आणि तोंडाला पट्टी बांधून धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरून हत्या केली. प्राथमिक दृष्ट्या चोरी किंवा लूटमार करण्याच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचं वाटत आहे, तरी मात्र घरातील साहित्य जसंच्या तसं असल्याने शंका उपस्थित केली जात आहे.
Nagpur: राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये (Nagpur) 78 वर्षीय वृद्धेची घरात गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. देवकी बोबडे असं हत्या झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. नागपूरातील टीबी रुग्णालयाच्या सेवानिवृत्त डॉक्टर होत्या. मारेकऱ्यांनी घरात घुसून वृद्ध देवकी बोबडे यांचे दोन्ही हात खुर्चीला बांधून आणि तोंडाला पट्टी बांधून धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरून हत्या केली. प्राथमिक दृष्ट्या चोरी किंवा लूटमार करण्याच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचं वाटत आहे, तरी मात्र घरातील साहित्य जसंच्या तसं असल्याने शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे वृद्ध महिलेच्या हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या घटनेमुळं पुन्हा एकदा उपराजधानी दहशतीखाली गेली आहे.
शनिवार 27 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास देवकी बोबडे ही वृद्ध महिला घरात एकटी होती. त्यावेळी अज्ञात आरोपी त्यांच्या घरात घुसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपींनी आधी देवकी बोबडे यांचे हात पाय खुर्चीला बांधले. त्यानंतर त्यांनी आरडा ओरडा करु नये, या उद्देशाने त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. संध्याकाळी घरी आल्यानंतर मुलीने दार उघडल्यावर देवकी बोबडे रक्ताच्या थारोळ्यात आढळल्या. त्यांची तपासणी केली असता त्या मृत होत्या आणि त्यांची गळा चिरून हत्या केल्याचं उघडकीस आलं होतं. (हे ही वाचा धक्कादायक! बेकायदेशीर अनाथाश्रमाचा पदार्फाश; तब्बल 71 मुलांची सुटका, संचालक डॉक्टरला अटक.)
नागपूरातील गायत्री कॉन्व्हेंटजवळ देवकी बोबडे राहत होत्या. त्या निवृत्त वैद्यकीय अधिकारी होत्या. घराच्या तळ मजल्यावर त्या पतीसह राहत होत्या. त्यांची मुलगी आणि जावई सुद्धा त्याच घराच्या पहिल्या मजल्यावर राहतात. देवकी यांचे वृद्ध पती जीवनदास बोबडे हे अर्धांगवायूने आजारी आहेत. नागपूर शहरातील नंदनवन भागात शनिवारी दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 28, 2021 02:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

