MVA On BJP: तुमचेच 25 आमदार आमच्या संपर्कात, त्यांना सुरक्षीत ठेवा; महाविकासआघाडीतील मंत्र्याचे भाजपला प्रत्युत्तर

सत्तार हे शिवसेनेचे मंत्री आहेत. सत्तार यांनी म्हटले आहे की, भाजपचेच 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत.

Abdul Sattar | (Photo Credit: Facebook)

महाविकासआघाडीतील (Maha Vikas Aghadi) 25 आमदार भाजपसोबत असल्याच्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या दाव्याला महाविकासाघाडीतील मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सत्तार हे शिवसेनेचे मंत्री आहेत. सत्तार यांनी म्हटले आहे की, भाजपचेच 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भाजपने त्यांच्याच आमदारांना सुरक्षीत ठेवावे असे सत्तार यांनी म्हटले आहे. दानवे यांनी केलेलेल्या दाव्याला सत्तार यांनी प्रतिदावा करुन आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. रावसाहेब दानवे यांच्या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

जालना येथे धुळवड साजरी करताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रावसाहेब दानवे यांनी म्हटले होते की, महाविकासआघाडीमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांच्यातील 25 आमदार अधिवेशनावरच बहिष्कार घालणार होते. मात्र, त्यांची समजूत घालून त्यांना अधिवेशनाला आणण्यात आले. हे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. निवडणुका जसजशा येतील तसतसे हे आमदार भाजपमध्ये येतील असे दानवे म्हणाले. दरम्यान, या आमदारांची नावे सांगायला मात्र दानवे यांनी नकार दिला. यावर अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना 'भाजपचेच 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत', असा दावा केला. (हेही वाचा, NCP Leaders On AIMIM Alliance: एमआयएम-राष्ट्रीवादी युतीची चर्चा, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, राजेश टोपे यांनी दिल्या प्रतिक्रिया)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार संजय राऊत यांनी घेतला आहे. काल होळी होती. त्यामुळे त्यांनी भांग किंवा नशा करुन त्यांनी हे वक्तव्य केले की काय माहिती नाही. राज्यात महाविकासआघाडी सरकार भक्कम आहे. त्यांनी काळजी करु नये. काल होळी संपली आहे. त्यामुळे आज सकाळी त्यांना विचारले तर कदाचित त्यांना त्यांनीच केलेले वक्तव्य आठवणारही नाही, असे राऊत म्हणाले.