Mumbai: महिलेने चुकीच्या खात्यात ट्रान्सफर केले तब्बल 7 लाख रुपये; वसई विरार पोलिसांनी केली पैसे परत मिळवण्यास मदत
महिलेचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आहे. मात्र पैसे पाठवताना महिलेने चुकीचा बँक खाते क्रमांक टाकला आणि योग्य खात्यात जाण्याऐवजी पैसे दुसऱ्याच्या खात्यात गेले.
मुंबई पोलीस (Mumbai Police) हे तत्परतेने नागरिकांना मदत करण्यासाठी ओळखले जातात. याआधी अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत जिथे मुंबई पोलीस संकटकाळात मुंबईकरांच्या मदतीला धावले आहेत. आताही असेच एक उदाहरण समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एका महिलेला तिचे तब्बल 7 लाख रुपये परत मिळवण्यास मदत केली आहे. सुरुवातीला महिलेने स्वतः हे पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात तिला यश आले नाही, त्यानंतर पोलिसात तक्रार केली असता हे पैसे तिला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मीरा जोड येथील 38 वर्षीय महिला 29 जून रोजी एका नातेवाईकाला पैसे ट्रान्सफर करत होती. महिलेचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आहे. मात्र पैसे पाठवताना महिलेने चुकीचा बँक खाते क्रमांक टाकला आणि योग्य खात्यात जाण्याऐवजी पैसे दुसऱ्याच्या खात्यात गेले. त्यानंतर महिलेने ताबडतोब बँकेशी संपर्क साधला.
बँकेच्या मदतीने ज्या व्यक्तीच्या खात्यात ते पैसे गेले होते त्याच्याकडे आपले पैसे परत करण्याची विनंती महिलेने केली, मात्र त्याने यासाठी नकार दिला. आपण लॉटरी जिंकली असल्याचे सांगत व्यक्तीने हे पैसे परत करण्यास नकार दिला. बँकेनेदेखील यामध्ये महिलेची चूक असल्याचे सांगत तिला मदत करण्यास नकार दिला. बँकेने तिला नकार दिल्यानंतर महिलेने 30 जून रोजी मीरा भाईंदर वसई विरार सायबर सेलशी संपर्क साधला. (हेही वाचा: Mumbai: 'यंदा मुंबईमध्ये कृत्रिम तलावांमध्येच होणार PoP गणेश मूर्तींचे विसर्जन'- BMC)
त्यानंतर पोलिसांनी लाभार्थी खातेदाराचा शोध घेतला आणि त्याला पैसे परत करण्याची विनंती केली. त्यावेळीही त्याने आपण लॉटरी जिंकल्याचे सांगत पैसे परत करण्यास नकार दिला. परंतु, जेव्हा पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करण्याची धमकी दिली, तेव्हा त्याने पैसे परत करण्याचे मान्य केले. पोलिसांच्या मदतीने महिलेला 2 जुलै रोजी पैसे परत मिळाले.