Mumbai Weather Update: राज्यभरात पारा वाढला; मुंबई, रायगड, कोल्हापूरसह विदर्भात 5 ते 7 मार्च दरम्यान पावसाची शक्यता- Report

परंतु, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आणि राजस्थान आणि उत्तर महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे सावट असल्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो,

Rain | (Photo Credit - Twitter/ANI)

यंदाचा हिवाळी हंगाम (Winter Season) अधिकृतपणे 28 फेब्रुवारी रोजी संपल्यानंतर, आता उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात मुंबई (Mumbai) शहर गरम होण्याची अपेक्षा आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.

बुधवारी सांताक्रूझ वेधशाळेने कमाल तापमान 33.9 अंश सेल्सिअस नोंदवले, जे सामान्यपेक्षा दोन अंश जास्त आहे. किमान तापमान 19.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. 18 फेब्रुवारी रोजी, शहरात 37.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जो आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस होता. आयएमडी तज्ञांच्या मते, या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरासरी दैनंदिन कमाल तापमान सामान्यपेक्षा 4-5 अंशांनी जास्त असेल.

मात्र त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे, हवामान तज्ञांनी मुंबई किंवा महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) परिणाम होण्याची शक्यता नाकारली आहे. यासह स्कायमेट हवामान सेवा तज्ञ आणि हवामान शास्त्रज्ञ महेश पलावत यांनी इशारा दिला की, 5 ते 7 मार्च दरम्यान, मुंबई, तसेच रायगड, कोल्हापूर, विदर्भ आणि अहमदनगरच्या विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. (हेही वाचा: पुणे तापणार, पुणेकरांनो काळजी घ्या! फेब्रुवारी 2023 मध्ये पाठिमागील 147 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद)

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना पलावत म्हणाले की, मार्चचे पहिले काही दिवस मुंबईत कोरडे आणि उष्ण दिवस अनुभवायला मिळतील. परंतु, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आणि राजस्थान आणि उत्तर महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे सावट असल्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, ज्यामुळे तापमान दोन अंशांनी घसरेल. ते पुढे म्हणाले की, नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान कोणतेही वेस्टर्न डिस्टर्बन्स नव्हते आणि हवामान कोरडे होते.