Mumbai Water Taxi: जानेवारी 2022 मध्ये सुरु होणार मुंबईमधील वॉटर टॅक्सी; जाणून घ्या प्रवासाचा मार्ग व दर

त्यांच्याकडे 50 आसनी, 40 आसनी, 32 आसनी आणि एक 14 आसनी वॉटर टॅक्सी आहेत, तर वेस्ट कोस्ट मरीन मध्ये दोन 12 आसनी आणि एक 20 आसनी जहाज आहे

Water Taxi (Photo Credits-Twitter)

नवीन वर्षापासून तुम्ही मुंबई (Mumbai) ते नवी मुंबई (New Mumbai) फक्त 15 मिनिटांत प्रवास करू शकाल. मुंबईमध्ये जानेवारीमध्ये बहुप्रतिक्षित वॉटर टॅक्सी (Water Taxi) सुरु होत आहे. ही वॉटर टॅक्सी मुंबई ते नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासाची 75% कपात करेल. साधारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही वॉटर टॅक्सी प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होईल. हा जलमार्ग मार्च 2021 मध्ये सुरू होणार होता, परंतु कोरोना आणि इतर कारणांमुळे त्याला विलंब झाला. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन करतील. यादरम्यान पंतप्रधान मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील केमिकल टर्मिनलचे उद्घाटनही करतील.

या प्रकल्पासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि सिडको यांनी हातमिळवणी केली आहे. सेवा चालविण्याचा परवाना दोन खाजगी कंपन्यांना देण्यात आला आहे - इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस एलएलपी आणि वेस्ट कोस्ट मरीन.

हा असेल मार्ग -

माझगाव येथील डोमेस्टिक क्रूझ टर्मिनलपासून बेलापूर, नेरुळ, वाशी, ऐरोली, रेवस (अलिबागजवळ), जेएनपीटी, करंजाडे येथील एलिफंटा लेणी आणि माझगाव येथील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलपर्यंत या वॉटर टॅक्सी चालतील. वॉटर टॅक्सीसाठी मुंबई ते एलिफंटा आणि जेएनपीटी 15 मिनिटे आणि मुंबई ते बेलापूर, नेरूळ, वाशी आणि रेवस असा 25-30 मिनिटांचा प्रवास आहे.

इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेसकडे चार जहाजांचा ताफा आहे. त्यांच्याकडे 50 आसनी, 40 आसनी, 32 आसनी आणि एक 14 आसनी वॉटर टॅक्सी आहेत, तर वेस्ट कोस्ट मरीन मध्ये दोन 12 आसनी आणि एक 20 आसनी जहाज आहे. इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेसचे सोहेल कझानी यांच्या मते, पावसाळ्यातही आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत वॉटर टॅक्सी चालतील. सुरुवातीला दिवसातून तीन वेळा सकाळी आणि संध्याकाळी आणि दुपारी टॅक्सी. मागणी जास्त असल्यास, दर 30 मिनिटांनी त्या ऑपरेट होतील. (हेही वाचा: पॅरासेलिंग करताना तुटली दोरी, हवेतच तरंगली महिला; अलिबाग येथील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

मुंबई ते नवी मुंबई वॉटर टॅक्सीचे भाडे प्रति प्रवासी रु. 1,000 ते रु. 1,200 दरम्यान असण्याची शक्यता आहे, तर जएनपीटी आणि एलिफंटाचे भाडे रु. 750 असण्याची शक्यता आहे. सध्या तरी भाडे खूपच जास्त आहे, परंतु प्रवाशांची संख्या वाढल्याने हे दर कमी होतील.