Mumbai Water Crisis: मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट, जलाशयात उरला केवळ 15.2 टक्के पाणीसाठा
यातील एक टक्का पाणी मुंबईत तीन दिवसाआड वापरले जाते.
मुंबईला पाणीपुरवठा (Mumbai Water Supply) करणाऱ्या सातही (Dam) धरणांमधील राखीव साठा मिळून 48 दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. जून महिना ओसरला तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. अशात, मुंबईकरांसमोर पाणीकपातीचं संकट उभं ठाकलं आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आता मुंबईलाही जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो. मुंबईत नाशिक, ठाणे, भिवंडी आदी भागातील सात तलावांमधून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मान्सूनवर (Monsoon) निर्भर असलेल्या बळीराजासोबतच धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने आटत असल्याने सर्वसामान्य नागरिक देखील चिंताग्रस्त झाला आहे. (हेही वाचा -Mumbai Local: तरुणाचा मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातून वैध तिकीटाशिवाय प्रवास; न्यायालयाने ठोठावला 26 हजार रुपयांचा दंड)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये केवळ 15.2 टक्के साठा शिल्लक आहे, जे सुमारे 2.4 लाख दशलक्ष लिटर इतके आहे. यातील एक टक्का पाणी मुंबईत तीन दिवसाआड वापरले जाते. गेल्या वर्षी 15 जून 2022 रोजी हा आकडा 12.24 टक्के होता. तर 2021 मध्ये याच तारखेला हा साठा 12.75 टक्के होता. मुंबईला वर्षभरात 14,47,36.3 दशलक्ष लिटर पाणी लागते. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला आणि मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली. ऑक्टोबरअखेर धरणांमध्ये 97 टक्के पाणीसाठा होता.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधला पाणीसाठा
अप्पर वैतरणा - शून्य टक्के
मोडकसागर - 22.17 टक्के
तानसा - 19.58 टक्के
मध्य वैतरणा - 13.32 टक्के
भातसा -5.27 टक्के
विहार - 21.92 टक्के
तुळसी - 28 टक्के
मागच्या वर्षीच्या तुलनेत धरणांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात सारखीच परिस्थिती आहे. मान्सून उशिरा दाखल होणार असल्याने चिंतेत आणखीच भर पडली आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो.