Mumbai: रेल्वे ट्रॅकवर स्टंट व्हिडिओ शूट करणाऱ्या सोशल मीडिया Influencer ला अटक
या स्टंटची क्लिप सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.
रेल्वे ट्रॅकवर भयानक स्टंट करणाऱ्या मुंबईतील (Mumbai) एका सोशल मीडिया influencer ला अटक करण्यात आली आहे. या स्टंटची क्लिप सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अरमान शेख (Armaan Shaikh) (21) असे या influencer चं नाव असून त्याचे इंस्टाग्रामवर (Instagram) तब्बल 2 लाख फॉलोअर्स आहेत. अरमानला अटक होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी देखील असेच स्टंट केल्यामुळे त्याला अटक झाली होती.
या स्टंटमध्ये तो बंदुकीने स्वत:ला गोळी घालत असल्याचे भासवत आहे. त्यानंतर ती बंदुक नसून सिगरेट लायटर असल्याचे समोर येते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती जागा जोगेश्वरी जवळील असल्याचे आमच्या निर्दशनास आले. त्यानंतर सोशल मीडियावर आम्हाला शेखचे अकाऊंट मिळाले आणि त्याच्या अकाऊंटवरील व्हिडिओ आम्ही चेक केले तेव्हा आम्हाला तो व्हिडिओ दिसला, असे अंधेरी पोलिस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर दत्तात्रेय निकम यांनी सांगितले.
युट्युबवरील एका न्यूज चॅनल रिपोर्टमध्ये शेख आणि त्याचा मित्र अरबाज खान याला विक्रोळी पार्कसाईट पोलिसांद्वारे 2020 मध्ये देखील अटक करण्यात आल्याचे म्हटले होते. त्यावेळेस त्यांनी चालत्या बाईकवर उभे राहण्याचा स्टंट केला होता. त्यानंतर पार्कसाईट पोलिसांनाकडून शेख याचा घाटकोपर येथील पत्ता घेण्यात आला. (YouTuber Gaurav Sharma: कुत्र्याच्या पाठीला हायड्रोजन फुगे बांधून हवेत सोडल्याबद्दल युट्युबर गौरव शर्मा यास अटक)
पोलिस मागावर असल्याचा सुगावा लागल्याने शेख याने घरातून पळ काढला. मात्र पोलिस त्याच्यावर नजर ठेवून होते आणि कालांतराने त्याला ताब्यात घेतलं. विनातिकीट प्रवास, मास्क न घालणे आणि इतर लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.