Mumbai: सायन उड्डाणपुल दुरुस्तीच्या कामानिमित्त 18 फेब्रुवारी पर्यंत बंद; प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा मुंबई पोलिसांचा सल्ला

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार हे काम मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 पर्यंत चालणार आहे.

Sion flyover to remain shut for repair work (Photo Credits: Twitter/@yogendra73)

मुंबईमधील (Mumbai) वाहतुकीसाठी महत्वाचा समजल्या जाणाऱ्या, सायन फ्लायओव्हरच्या (Sion Flyover) दुरुस्तीचे काम शुक्रवार, 14 फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार हे काम मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 पर्यंत चालणार आहे. या कालावधीत सायन उड्डाणपुलावरील वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. सायन उड्डाणपुलाचे बेअ‌रिंग बदलण्याचे काम चालू असल्याने प्रवाशांना थोडा त्रास होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटके यांच्या म्हणण्यानुसार, उड्डाण पुलाच्या दुरुस्तीसाठी वाहतूक शाखेतर्फे 8 ट्रॅफिक ब्लॉकला मान्यता देण्यात आली आहे.

पहिला ब्लॉक 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान असेल. एमएसआरडीसीने यापूर्वी उड्डाणपूल पूर्णपणे बंद करण्याऐवजी, आठवड्यातून सकाळी 10 ते सकाळी 6 या वेळेत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर एमएसआरडीसीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार उड्डाणपूल पहिल्या ब्लॉक दरम्यान पूर्णपणे बंद राहील, तर इतर सात ब्लॉकमध्ये पूर्वनिर्धारित वेळेनुसार दुरुस्तीचे काम केले केले जाणार आहे.

29 पिलरवर उभे असलेल्या सायन उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी 170 बेअरिंग्ज वापरली गेली आहेत. दुरुस्तीदरम्यान, 106 जॅकच्या मदतीने 170 बेअरिंग्ज बदलली जातील. शशिकांत यांच्या मते, बेअरिंग्ज बदलण्याचे काम 14 फेब्रुवारी ते 6 एप्रिलदरम्यान चालेल. यानंतर उड्डाणपुलाचे एक्सपेंशन जॉइंट बदलने आणि डांबरीकरण यामुळे, 6 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान उड्डाणपुलांवरील वाहनांची वाहतूक 20 दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे. (हेही वाचा: मुंबई: सायन उड्डाणपूल 20 एप्रिलपासून पुढील दोन महिने वाहतुकीसाठी बंद)

या दिवशी असतील ट्रॅफिक ब्लॉक (रात्री 10 ते सकाळी 6) -

20 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी

27 फेब्रुवारी ते 2 मार्च

5 मार्च ते 9 मार्च

12 मार्च ते 16 मार्च

19 मार्च ते 23 मार्च

26 मार्च ते 30 मार्च

2 एप्रिल ते 6 एप्रिल

दरम्यान, 1999 मध्ये एमएसआरडीसीने सायन उड्डाणपूल बांधला. 2017 मध्ये आयआयटी बॉम्बेने उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. आयआयटीने आपल्या अहवालात उड्डाणपुल बेअरिंग्ज बदलण्याची शिफारस केली होती.