Mumbai Sakinaka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणात एकच आरोपी, महिलेचा जबाब घेता आला नाही- मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

पोलिसांनी आरोपी मोहन चौहान याला ताब्यात घेतले आहे. आरोपी हा उत्तर प्रदेश येथील मूळचा राहणारा आहे. या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये या प्रकरणात एकच आरोपी असल्याचे पुढे आले आहे.

Hemant Nagrale | (Photo Credits: Facebook)

साकीनाका बलात्कार प्रकरणातील (Mumbai Sakinaka Rape Case) पीडितेचा मृत्यू झालेला आहे. पोलिसांनी आरोपी मोहन चौहान याला ताब्यात घेतले आहे. आरोपी हा उत्तर प्रदेश येथील मूळचा राहणारा आहे. या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये या प्रकरणात एकच आरोपी असल्याचे पुढे आले आहे. एका सक्षम अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांची (Mumbai Police एक विशेष टीम या प्रकरणाचा तपास करणार आहे. पुढील एक महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai Police Commissioner Hemant Nagrale) यांनी दिली आहे. मुंबई येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेमंत नगराळे ( Hemant Nagrale) यांनी सांगितले की, अत्यावस्थ असल्याने पीडित महिलेचा जबाब पोलिसांना घेता आला नाही. त्यामुळे तिच्यासोबत नेमके काय घडले याबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत. परंतू, आमचा तपास सुरु आहे. पोलीस तपासात सर्व बाबी पुढे येतील. नऊ सप्टेंबरच्या रात्री 3.20 वाजता पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रुम) एक फोन आला. हा फोन मुबईतील साकिनाका येथील खैरानी रोड परिसरात असलेल्या एका कंपनीच्या चौकीदाराचा होता. त्याने इथे एका महिलेला जबरी मारहाण सुरु असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. (हेही वाचा, Mumbai Sakinaka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू, आरोपी मोहन चौहान याला अटक)

नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्याला घटनास्थळी पाठविण्यात आले. पोलिस घटनास्थळी पोहोचताच लक्षात आले की महिलेची प्रकृती अत्यंत अत्यावस्थ आहे. त्यामुळे पोलिसांनी चौकीदाराकडून एका टेम्पोची चावी घेऊन महिलेला स्वत: टेम्पो चालवत राजावाडी रुग्णालयात दाखल केले. घटनेची भीषणता लक्षात घेऊन साकीनाका पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी कामाला लागले. त्यांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेतले, अशीही माहिती हेमंत नगराळे यांनी या वेळी दिली. पोलिसांनी आरोपी विरोधात 307,376, अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पीडित महिलेच्या मृत्यूनंतर 302 अन्वये हत्येच्या आरोपाचा गुन्हाही पोलिसांनी आरोपीविरोधात दाखल केला असल्याचे हेमंत नगराळे यांनी सांगितले.