Mumbai Rape Cases: गेल्या 10 वर्षात मुंबई शहरातील बलात्काराच्या घटनांमध्ये 130% वाढ; Praja Foundation च्या अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
2022 च्या अखेरीस, POCSO प्रकरणांपैकी 73 टक्के प्रकरणांचा तपास प्रलंबित होता, असे प्रजा फाऊंडेशनने 'मुंबईतील पोलिसिंग आणि कायदा आणि सुव्यवस्था, 2023' या विषयावरील अहवालात म्हटले आहे.
मुंबईमध्ये (Mumbai) 2013 ते 2022 या काळात बलात्काराच्या (Rape) नोंदी झालेल्या घटनांची संख्या 391 वरून 901 वर पोहोचली आहे. गेल्या 10 वर्षात ही संख्या 130 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासह विनयभंगाच्या घटना 1,137 वरून 105 टक्क्यांनी वाढून 2,329 वर आल्या आहेत. प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी 2022 मध्ये बलात्काराच्या घटनांमधील 63 टक्के पीडित अल्पवयीन मुली होत्या आणि या प्रकरणांची POCSO कायद्यांतर्गत नोंद करण्यात आली आहे.
2022 च्या अखेरीस, POCSO प्रकरणांपैकी 73 टक्के प्रकरणांचा तपास प्रलंबित होता, असे प्रजा फाऊंडेशनने 'मुंबईतील पोलिसिंग आणि कायदा आणि सुव्यवस्था, 2023' या विषयावरील अहवालात म्हटले आहे. जुलै 2023 पर्यंत तपास अधिकाऱ्यांची 22 टक्के कमतरता असल्याच्या पार्श्वभूमीवर हे घडले आहे. 2022 च्या अखेरीस, 44 टक्के प्रकरणांमध्ये फॉरेन्सिक तपासणी प्रलंबित होती. मार्च 2023 पर्यंत फॉरेन्सिक विभागात 39 टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता होती.
2018 ते 2022 या कालावधीत सायबर गुन्ह्यांमध्ये 243 टक्क्यांनी वाढ झाली असून प्रकरणांची संख्या 1,375 वरून 4,723 वर पोहोचली आहे, असेही फाउंडेशनने अधोरेखित केले आहे. याच कालावधीत क्रेडिट कार्ड फसवणूक आणि संबंधित प्रकरणांमध्ये 657 टक्क्यांनी (461 ते 3,490) वाढ झाली आहे. 2022 मध्ये नोंदणीकृत सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये तपासाचे प्रमाण केवळ 8 टक्के होते. (हेही वाचा: Pune Shocker News: धक्कादायक, झोपमोड केल्यामुळे भाडेकरुकडून घरमालकाची हत्या, पुण्यातील घटना)
यासारख्या समस्येवर अंकुश ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी पोलीस ठाण्यांमध्ये सायबर सेलची निर्मिती करणे, अशा काही उपाययोजना केल्या असल्या तरी तपासाचे प्रमाण फार कमी आहे. हे प्रमाण सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांचा जलद गतीने तपास करण्यासाठी तांत्रिक कौशल्यांवर पोलीस अधिकार्यांची क्षमता वाढवण्याची गरज अधोरेखित करते, असे योगेश मिश्रा, संशोधन प्रमुख, प्रजा फाऊंडेशन यांनी सांगितले.