Mumbai Rape Case: मुंबईमध्ये 5 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वडिलांच्या मित्राकडून बलात्कार; 30 वर्षीय आरोपीला अटक, गुन्हा दाखल
या प्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.
सध्या देशामध्ये उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरणाबाबत संताप, रोष पसरला असताना, आता मुंबई (Mumbai) मधून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) झाल्याची घटना समोर येत आहे. या प्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. सोमवारी पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा या व्यक्तीवर आरोप आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीतेच्या वडिलांची आणि आरोपीची ओळख होती. हा आरोपी वरचेवर पीडितेच्या घरी जात असे. आरोपी सोमवारी दुपारी पिडीतेच्या घरी गेला असता त्याला ही अल्पवयीन मुलगी एकटीच घरी असलेली आढळली.
परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्याचवेळी पीडितेचा मोठा भाऊ घरी पोहोचला. घडलेली घटना पाहता त्याने ताबडतोब शेजाऱ्यांना व आपल्या पालकांना याची माहिती दिली. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी आरे पोलिस ठाण्यात संपर्क साधला आणि आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला. पोलिसांनी या तक्रारीविरोधात कारवाई करत आरोपीला अटक केली. त्याच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये पोक्सो (POCSO) सह कलम 376 (बलात्कार) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
दरम्यान, काल मुंबईच्या डोंबिवलीमध्येही (Dombivli) बलात्काराची अतिशय संतापजनक घटना घडली आहे. जन्मदात्या बापाने आपल्या 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला असून, पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून नराधम पित्याला अटक करण्यात आले आहे. या बापा विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा: Thane: 24 वर्षीय युवकाचा शेजारी राहणाऱ्या 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पोलिसांकडून अटक)
यासह, एनसीआरबीच्या म्हणण्यानुसार महिलांवरील हिंसाचाराच्या बाबतीत मुंबई दुसर्या क्रमांकावर आहे. 2019 मध्ये मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या 6,519 घटनांची नोंद झाली होती. दिल्लीचा क्रमांक मुंबईच्या आधी आहे, तिथे 12,902 गुन्हे दाखल झाले आहे. खेदजनक बाब म्हणजे 2019 मध्ये मुंबईत बलात्काराच्या 394 घटनांची नोंद झाली आहे. बलात्काराच्या घटनांमध्ये मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे तर दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे.