Mumbai Rains Update: मुंबईला पावसानं झोडपलं; अंधेरी- वांद्रे दरम्यान विशेष सेवा सुरु तर वांद्रे-चर्चगेट दरम्यान लोकल सेवा निलंबित

रेल्वे रुळावरही पाण्याखाली गेल्याने पश्चिम आणि हार्बर रेल्वे ठप्प झाली आहे. दादर-प्रभादेवी भागात पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वांद्रे ते चर्चगेट दरम्यानची वाहतूक बंद, केवळ विरार-अंधेरी-वांद्रे लोकल वाहतूक सुरु असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने केली.

Mumbai Rains | (Photo Credits: ANI)

मुंबई (Mumbai) येथील दमदार पावसाचा फटका रेल्वेलाही बसला आहे. रेल्वे रुळावरही पाण्याखाली गेल्याने पश्चिम आणि हार्बर रेल्वे ठप्प झाली आहे. दादर-प्रभादेवी भागात पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वांद्रे ते चर्चगेट दरम्यानची वाहतूक बंद, केवळ विरार-अंधेरी-वांद्रे लोकल वाहतूक सुरु असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने (Western Railway) केली.  मध्य रेल्वेवरील वाहतूक धीम्यागतीने धावत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या विविध भागात रात्रीपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. मुंबईतदादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे. शिवाय, पुढील 24 तासात मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra Monsoon Update: मुंबई, ठाणे, कोकणात पुढील 48 तास मुसळधार पावसाची शक्यता, IMD ने जारी केला रेड अलर्ट)

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे संकल भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. दुसरीकडे, आयएमडीचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंंबई (Mumbai), ठाणे (Thane)  व उत्तर कोकणात (Konkan) पुढील 48 तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच पार्श्वभुमीवर या भागांत रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगर व ठाणे जिल्ह्यात काल रात्रीपासुनच जोरदार पावसाला सुरुवात झाली असून पुढील 48 तास पाऊस कायम राहणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.

आज मुंबईच्या समुद्रात 12:47 वाजता 4.51 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत,अशा वेळी नागरिकांंनी घरातुन बाहेर पडु नये असे बीएमसीकडुन आवाहन करण्यात आले आहे. तसेच अतिवृष्टीचा अंदाज पाहता आपत्कालीन सेवा वगळता सर्व कार्यालये व अन्य आस्थापने आज बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. मुंबईसह उपनगरात आज (4 ऑगस्ट) आणि बुधवार (5 ऑगस्ट) रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने समुद्र किनारा आणि किनाऱ्यालगत जाण्याचे नागरिकांनी टाळावे, तसेच एखाद्या ठिकाणी पाणी साचल्यास त्या ठिकाणीही जाणे टाळावे, अशा सूचना मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे.