Mumbai-Pune Travel Time: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ 20 ते 25 मिनिटांनी कमी होणार; द्रुतगती मार्गावर लवकरच सुरु होणार नवीन लेन- Reports

या मार्गाचे बांधकाम फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झाले. एमएसआरडीसीला विश्वास आहे की नवीन लेनमुळे केवळ मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवासाचा वेळ कमी होणार नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी देखील मिळेल.

Mumbai Pune Expressway Traffic | (Photo Credit - Twitter)

लवकरच मुंबई-पुणे (Mumbai-Pune) प्रवासाचा वेळ 20 ते 25 मिनिटांनी कमी होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन लेन बांधत आहे. पुणेकर न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे. खोपोली आणि कुसगावला जोडणाऱ्या या नवीन मार्गाचे सध्या 65% काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम वेगाने सुरू आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मते, नवीन लेनचे बांधकाम डिसेंबरच्या अखेरीस पूर्ण होईल आणि जानेवारी 2024 मध्ये या मार्ग वाहतुकीसाठी खुले होईल.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेमुळे प्रवासाचा कालावधी कमी झाला आहे, मात्र त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी, अपघात टाळण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ सुधारण्यासाठी एमएसआरडीसीने खोपोली आणि कुसगाव दरम्यान नवीन लेन तयार करण्याचा निर्णय घेतला.

नवीन मार्ग 19.80 किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गाचे बांधकाम फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झाले. एमएसआरडीसीला विश्वास आहे की नवीन लेनमुळे केवळ मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवासाचा वेळ कमी होणार नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी देखील मिळेल. (हेही वाचा: Electricity Price Hike in Mumbai: मुंबईकरांना महागाईचा झटका; विजेच्या दरात 5 -10 टक्के वाढ; जाणून घ्या नवीन दर)

दुसरीकडे, 1 एप्रिलपासून मुंबई-पुणे महामार्गावरील टोलमध्ये 18.51% पर्यंत वाढ झाली आहे. माहितीनुसार, कार वापरकर्त्यांना आतापर्यंतच्या 270 रुपयांच्या तुलनेत 320 रुपये आकारले जातील. या मार्गावर धावणाऱ्या मिनी बसेसना 420 रुपयांच्या तुलनेत 495 रुपये मोजावे लागतील आणि दोन एक्सलपर्यंतच्या ट्रकला 580 रुपयांच्या तुलनेत 685 रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे प्रत्येक बसला 940 रुपये मोजावे लागतील. दोन पेक्षा जास्त एक्सल असलेल्या ट्रकला 1,630 रुपये आणि ट्रेलर्सना 2,165 रुपयांपर्यंत पैसे द्यावे लागतील.