Mumbai-Pune-Hyderabad Bullet Train: लवकरच मुंबईमधून धावणार पुणेमार्गे हैद्राबादला जाणारी बुलेट ट्रेन; प्रक्रिया झाली सुरु

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भूसंपादन काम जवळपास संपल्यानंतर, मुंबई-नाशिक-नागपूर मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यानंतर आता मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन (Mumbai-Hyderabad Bullet Train) प्रकल्पाच्या नियोजनाचे कामही वेगाने सुरू झाले आहे

Bullet Train (Representational Image: PTI)

मुंबईमधून आता अजून एक बुलेट ट्रेन धावणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भूसंपादन काम जवळपास संपल्यानंतर, मुंबई-नाशिक-नागपूर मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यानंतर आता मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन (Mumbai-Hyderabad Bullet Train) प्रकल्पाच्या नियोजनाचे कामही वेगाने सुरू झाले आहे. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) या तिसऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यातील ही बुलेट ट्रेन मुंबई-हैदराबाददरम्यानचे 717 किमी अंतर कापेल. ही ट्रेन मुंबईहून ठाणे-पुणे व पुढे हैद्राबादला जाईल.

संबंधित प्रकल्पाचा अहवाल तयार केला जात आहे. यामुळे होणाऱ्या पर्यावरणीय आणि सामाजिक परिणामांचे विश्लेषण आणि त्याच्याशी संबंधित माहिती प्राप्त केली जात आहे. ठाणे जिल्ह्यातील स्थानिक लोकांचे मत जाणून घेण्यासाठी, आज (27 सप्टेंबर, सोमवार) प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात चर्चा आयोजित केली होती. पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक हाय स्पीड रेल्वे प्रकल्प आहे.

मुंबई ते हैदराबाद धावणारी बुलेट ट्रेन केवळ महाराष्ट्राला दक्षिण भारताशी जोडण्यातच यशस्वी होणार नाही, तर महाराष्ट्रातील शहरांना एकमेकांशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. ही ट्रेन मुंबईमधून सुरु होईन ठाणे, कामशेत (लोणावळा), पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलमर्गामार्गे हैद्राबादला पोहोचेल. या मार्गावर 11 स्थानके असतील. या ट्रेनचा जास्तीत जास्त वेग 350 किमी/तास असेल आणि सरासरी वेग 250 किमी प्रति तास असेल. प्रत्येक ट्रेन 350 प्रवासी वाहून नेण्यास सक्षम असेल. मुंबई व हैदराबादमधील अंतर 717 किमी आहे आणि सध्या ते कापण्यास 15 तास लागतात. मात्र या रेल्वे सेवेमुळे हा प्रवासाचा वेळ साडेतीन तासांपर्यंत कमी होईल. (हेही वाचा: मुंबईत 800 हून अधिक अधिकृत खड्डे असल्याची माहिती पण नागरिकांनी व्यक्त केला संताप)

मुंबई-अहमदाबाद मार्गावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे अडथळे दूर करत भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. दुसरीकडे, मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचे काम सुरू करण्यापूर्वी ठाणे जिल्ह्यातील स्थानिक लोकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता मुंबई-हैदराबाद मार्गासाठी तिसऱ्या बुलेट ट्रेनची प्रक्रिया सुरू केली जात आहे.