मुंबई-पुणे महामार्गावर टोलच्या दरात येत्या 1 एप्रिलपासून वाढ, वाहनचालकांना बसणार फटका

तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी सोमवारी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर यांना टोल वसूली करण्याचे अधिकार दिले आहेत.

Toll Plaza (Image: PTI)

मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) येत्या 1 एप्रिल पासून टोलच्या दरात वाढ होणार आहे. तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी सोमवारी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर यांना टोल वसूली करण्याचे अधिकार दिले आहेत. तसेच या मार्गावर नव्या कंत्राटदाराची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे. याच कारणास्तव आता टोलच्या दरात वाढ होणार असून त्याचा फटका वाहनचालकांना बसणार आहे. तर नव्या नियमानुसार कारचालकांना 230 रुपयांऐवजी 270 रुपये, मिनीबससाठी 355 रुपयांवरुन 420 रुपये, ट्रकसाठी आणि अवजड वहानांसाठी 493 रुपयांवरुन 580 रुपये करण्यात आले आहे. तसेच बससाठी 675 रुपयांवरुन 797 आणि मोठ्या ट्रकसाठी 1165-1555 रुपयांवरुन 1835 रुपयांपर्यंत टोलची वसूली आता केली जाणार आहे.

आयआरबी इन्फास्ट्रक्चर डेव्हलपमेंट 8262 कोटी रुपये एमएसआरडीसी यांना देणार आहे. तसेच पुढील 15 वर्ष महामार्गावर टोल वसूली करण्याचे अधिकार आयआरबी यांना देण्यात आले आहेत. यापूर्वी अदनानी ग्रुपने सुद्धा या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. मात्र त्यानंतर अदनानी ग्रुपने माघार घेतली. तर 93 किमी अंतर असलेला मुंबई-पुणे महामार्ग हा पहिलाच भारतातील सहापदरी, हायस्पीड असा मार्ग आहे. हा महामार्ग कळंबोळी (पनवेल जवळ0 येथून सुरु होत असून देहू रोड (पुणे जवळ) येथे संपतो.(मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर बस दरीत कोसळली; 4 जण ठार,30 जखमी)

गेल्या वर्षात नोव्हेंबर महिन्यापासून मुंबई-पुणे महामार्गावर वाहनाच्या वेगाची मर्यादा ठरवण्यात आली होती. त्यानुसार चालकांना 120 किमी प्रतितास वेगाने प्रवास करता येणार नसून त्यांचा वेग 100 किमी प्रतितास असावा असे राज्य वाहतूक मंडळाने जाहिर केला होता. तर महामार्गावर बहुतांश वेळा ओव्हरस्पीडींगमुळे अपघात होत असल्याच्या घटनेत वाढ असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. तसेच घाटात वाहनांसाठी 50 किमी प्रतितास अशी मर्यादा ठेवण्यात आली होती. महामार्गावर वेग मर्यादेसह नवी वाहतुकीचे चिन्हे सुद्धा लावण्यात येणार होती.