Mumbai-Pune Expressway Accidents: मुंबई आणि पुणे यांना जोडणारा मुंबई-पुणे एक्सप्रेसवे (Mumbai-Pune Expressway) हा भारताचा पहिला प्रवेश-नियंत्रित (Access Controlled) द्रुतगती मार्ग आहे. वेळ आणि इंधन वाचवण्यासाठी, तसेच जलद आणि सुरक्षित प्रवासासाठी हा मार्ग अतिशय महत्त्वाचा समजला जातो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये हा महामार्ग खरच प्रवाशांसाठी सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई-पुणे द्रुतगतीमहामार्गावर 2024 मध्ये अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. एक्स्प्रेसवेवरील अपघातांमध्ये 19% वाढ झाली असून, मृत्यूचे प्रमाण 26% ने वाढले आहे. मृत्यू संख्या 2023 मधील 65 वरून 2024 मध्ये 82 पर्यंत गेली.
प्राणघातक अपघातांची संख्यादेखील 23% ने वाढली, ज्यामध्ये 57 वरून 70 पर्यंत वाढ झाली. गंभीर आणि किरकोळ अपघातांमध्ये अनुक्रमे 41% आणि 39% ची चिंताजनक वाढ दिसून आली. दुसरीकडे, मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती मार्गावर अपघातामध्ये 4 टक्क्यांनी घट झाली आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे अपघात कारण-
सध्या, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि राष्ट्रीय महामार्ग-4 खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र होतात आणि खंडाळा एक्झिटजवळ वेगळे होतात. आडोशी बोगद्यापासून खंडाळा एक्झिट पर्यंतचा भाग सहा-लेनचा आहे, परंतु तो सहा-लेन YCEW आणि चार-लेन राष्ट्रीय महामार्ग-4 अशा दोन्ही वाहतुकीला सामावून घेतो, ज्यामुळे विशेषतः जड वाहतूक आणि भूस्खलनाच्या वेळी या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. यामुळे या भागात वाहनाचा वेग कमी होतो आणि प्रवासाचा वेळ वाढतो, परिणामी वाहनचालक उर्वरित एक्सप्रेस वेवर वेग वाढवतात, ज्यामुळे अपघातांची संख्या वाढते.
यासह, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वेगमर्यादा ओलांडणे, झोपेत गाडी चालवणे आणि चुकीचे वळण घेणे यामुळे अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही, पेट्रोलिंग, आपत्कालीन मदत केंद्रे आणि रस्ते सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: MSRTC Buses Accidents: पुणे विभागातील एमएसआरटीसी बसेसचे केवळ 21 महिन्यांत तब्बल 301 अपघात; 35 जणांचा मृत्यू)
महाराष्ट्रातील अपघात-
महाराष्ट्राच्या तात्पुरत्या अपघातांच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये रस्ते अपघातांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे, तर मृत्यूच्या संख्येत किरकोळ घट झाली आहे. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये राज्यात 841 अधिक अपघात आणि 31 कमी मृत्यू झाले. देशातील सर्वाधिक औद्योगिक राज्य असलेल्या महाराष्ट्रात 3.8 कोटींहून अधिक वाहने आहेत.