शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांना झेड दर्जाची सुरक्षा, सचिन तेंडुलकर यांची सुरक्षा घटवली, महाराष्ट्र सरकारचा निर्णय

तर, आमदार आदित्य ठाकरे यांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा होती. विद्यमान सरकारने दोघांच्याही सुरक्षा श्रेणीत बदल करत आदित्य ठाकरे यांना 'वाय प्लस' वरुन वाढ करत 'झेड' सुरक्षा देण्यात आली आहे.

Sachin Tendulkar, Aaditya Thackeray | (Photo credit: Archived, edited, symbolic image )

महाविकासआघाडी ( Maha Vikas Aghadi) सरकारने राज्यातील सुमारे 45 महत्त्वाच्या व्यक्तिंच्या सुरक्षेत महत्त्वाचा बदल केला आहे. मुंबई पोलीसांनी (Mumbai Police) दिलेल्या माहितीनुसार काही व्यक्तिंची सुरक्षा श्रेणी वाढवली आहे. तर काहींची सुरक्षा श्रेणी घटविण्यात आली आहे. यात शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यासह सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam ), समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्यासारख्या अनेक व्यक्तिंचा समावेश आहे. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना 'एक्स' दर्चाची सुरक्षा होती. तर, आमदार आदित्य ठाकरे यांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा होती. विद्यमान सरकारने दोघांच्याही सुरक्षा श्रेणीत बदल करत आदित्य ठाकरे यांना 'वाय प्लस' वरुन वाढ करत 'झेड' सुरक्षा देण्यात आली आहे. तर, सचिन तेंडुलकर यांना मिळत असलेली 'एक्स' दर्जाची सुरक्षाही काढण्यात आली आहे. सचिनला यापुढे पोलिस एस्कॉर्ट सुरक्षा व्यवस्था असणार आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांना असलेली 'झेड प्लस' सुरक्षा कमी करुन 'एक्स' दर्जाची करण्यात आली आहे. (हेही वाचा, महाविकासआघाडी सरकार हे शेतकऱ्यांचा पाठिराखा म्हणन काम करेन: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते यांना पूर्वी वाय दर्जाची सुरक्षा आणि त्यासोबत एस्कॉर्ट सुरक्षाही मिळत होती. मात्र, त्यातही घट करुन आता खडसेंना केवळ एस्कर्ट दर्जाची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याही सुरक्षेत घट करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम यांना 'झेड प्लस' दर्जाची सुरक्षा मिळत होती. आता त्यांना 'वाय' दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना 'वाय प्लस' वरुन 'झेड' दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे.