Mumbai Police: 50 वर्षांवरील पोलिसांना आता 12 तास ड्युटी व 24 तास आराम; इतरही अनेक सवलती लागू, घ्या जाणून 

हे नवीन आदेश पोलीस आणि त्यांच्या कुटुंबाला काही प्रमाणत संरक्षण देऊ शकतील. पोलिस उपायुक्त (पीआरओ) एस चैतन्य म्हणाले, 'नवीन नियमांमुळे 50 किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील आणि इतर आज असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे

Mumbai Police (Photo Credits: Twitter)

सध्या राज्यात कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत आहे तर दुसरीकडे शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. अशा वेळी डॉक्टर आणि पोलीस (Maharashtra Police) यांच्यावरील भार वाढला असून त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. या पार्श्वभुमीवर पोलिसांचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आपल्या 50 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांना 12 तासाच्या शिफ्टमध्ये काम करून नंतर एक दिवसाची सुटी घेण्यास सांगितले आहे. म्हणजेच 12 तास ड्युटी व 24 तास आराम.

मंगळवारी याबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आले. यामध्ये मधुमेह, रक्तदाब, कर्करोग किंवा कोणत्याही जीवघेण्या रोगासारखी वैद्यकीय स्थिती असलेल्या कर्मचार्‍यांनाही अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या परिपत्रकात असेही नमूद केले आहे की, कोणतेही आजार नसलेल्या 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कर्मचाऱ्यांनी 12 तास शिफ्टमध्ये काम करावे आणि 12 तास विश्रांती घ्यावी.

याव्यतिरिक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी, ज्या कर्मचाऱ्यांना घरी पोहोचण्यासाठी वेळ लागतो त्यांना पोलिस स्टेशन जवळ निवास व्यवस्था द्यावी आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी दोन आठवड्यांची सुट्टी द्यावी असेही सांगण्यात आले आहे. सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांनी स्वाक्षरी केलेले आदेश, कॉन्स्टेबल ते सहाय्यक उपनिरीक्षक अशा सर्व कर्मचार्‍यांना लागू आहेत. (हेही वाचा: फोन टॅपींग प्रकरणी IPS Officer Rashmi Shukla यांची आज चौकशी; कोरोना स्थितीचे कारण देत अनुपस्थित राहण्याची शक्यता)

सध्या पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, तसेच अनेकांचा मृत्यूही झाला आहे. हे नवीन आदेश पोलीस आणि त्यांच्या कुटुंबाला काही प्रमाणत संरक्षण देऊ शकतील. पोलिस उपायुक्त (पीआरओ) एस चैतन्य म्हणाले, 'नवीन नियमांमुळे 50 किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील आणि इतर आज असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे व्हायरस पसरण्याची शक्यता कमी होण्यास मदत होईल.' त्यांनी पुढे सांगितले की, संरक्षणासाठी पोलिसांना डबल मास्क आणि फेस शिल्ड घालणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, सॅनीटायझरचा वापर करणे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.