Police Commemoration Day: शहीद पोलिसांना Mumbai Police ने वाहिली आदरांजली
1959 साली चीन पासून देशाच्या सीमांचं रक्षण करताना शहीद झालेल्या 10 पोलिसांना मानवंदना म्हणून या दिवसाचं महत्व आहे.
पोलीस स्मृतिदिनानिमित्त (Police Commemoration Day) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ट्विटरवरून हौतात्म्य पत्करलेल्या सर्व पोलिसांना आदरांजली वाहिली आहे. दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस सेवेत शहीद झालेल्यांना आदरांजली म्हणून साजरा केला जातो. 1959 साली चीन पासून देशाच्या सीमांचं रक्षण करताना शहीद झालेल्या 10 पोलिसांना मानवंदना म्हणून या दिवसाचं महत्व आहे.
1960 च्या जानेवारी महिन्यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील पोलीस महानिरीक्षकांच्या वार्षिक परिषदेमध्ये स्मृतिदिनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. 2012 पासून पोलीस स्मृतिदिन परेडची सुरवात करण्यात आली. ही परेड चाणक्यपुरी येथील पोलीस स्मारकात राष्ट्रीय स्तरावर पार पडली जाते. आत्तापर्यंत 35000 पेक्षा जास्त पोलिसांनी देशाच्या अखंडता आणि सुरक्षेच्या कारणास्तव हौतात्म्य पत्करले आहे.
1959 च्या ऑक्टोबर पर्यंत भारताच्या तिबेटला लागून असलेल्या 2500 मैलांच्या सीमेची जबाबदारी ही पोलिसांवर होती. 'लानकला' येथे जाण्याकरता भारतीय मोहिमेच्या पुढील वाटचालीचा आढावा घेण्यासाठी उत्तर पूर्व लडाख मध्ये 3 तुकड्या तयार करण्यात आल्या. पैकी 2 तुकड्या त्या दिवशी दुपारपर्यंत परत आल्या तर दोन पोलीस कॉन्स्टेबल आणि एक पोर्टर असणारी तिसरी तुकडी मात्र येऊ शकली नाही. सर्व पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सकाळी तिसऱ्या तुकडीसाठी शोध मोहीम सुरु केली. पण चीनची आर्मी तिथे टेकडीवर आधीच पोचल्या कारणाने त्यांनी या पोलिसांवर ग्रेनेड फेकण्यास सुरवात केली. परंतु मागे मदतीला कोणीही नसल्यामुळे बऱ्याच जणांना गंभीर दुखापती झाल्या. तर 10 जण या सर्व गदारोळात शहीद झाले. तर 7 दुखापतग्रस्तांना चीनच्या लोकांनी पळवून नेलं.