Mumbai Police: अपहरण झालेल्या एक वर्षाच्या चिमुरडीची 48 तासांत सुटका; मुंबई पोलिसांनी शेअर केला मायलेकीच्या पुनर्मिलनाचा भावूक क्षण
एक वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. तिची अवघ्या 48 तासांत मुंबई पोलिसांनी सुखरुप सुटका केली.
मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) कामगिरीचे अनेक दाखले आहेत. कर्तृत्व, धाडस यामुळे मुंबई पोलिसांचे अनेक स्तरात कौतुक होत असते. मुंबई पोलिसांच्या कामगिरीची अजून एक घटना समोर येत आहे. अपहरण करण्यात आलेल्या एका वर्षाच्या मुलीची मुंबई पोलिसांनी अवघ्या 48 तासांत सुखरुप सुटका केली. ठाण्यातील हिरानंदानी (Hiranandani, Thane) येथून आरोपीलाही अटक करण्यात आली असून मुलीला सुखरुप तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (दहिसर रेल्वे ट्रॅकवर अडकलेल्या 60 वर्षीय व्यक्तीचे मुंबई पोलिस कॉन्स्टेबलने वाचवले प्राण; पहा व्हिडिओ)
मुंबई पोलिसांनी ट्विटच्या माध्यमातून ही महिती दिली असून आई-मुलीच्या पुनर्मिलनाचा भावूक क्षणांचा व्हिडिओही शेअर केला आहे. मुलीची सुटका करण्यासाठी मालवणी पोलिस ठाण्यातील पोलिसांनी 3 टिम्स तयार केल्या होत्या. त्यांच्याद्वारे शोधमोहिम सुरु होती. अखेर 48 तासांनंतर आरोपीला ठाण्यातील हिरानंदानी येथून अटक करण्यात आली आणि मायलेकींची पुन्हा भेट झाली. (Mumbai: अक्सा बीचवर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा मुंबई पोलिसांनी वाचवला जीव)
Mumbai Police Tweet:
अपहरण झाल्यापासून मुलीची आई सतत रडत होती. मुलीच्या भेटीनंतर आनंदाश्रणूंनी पाणावलेल्या डोळ्यांनी मातेने पोलिसांचे आभार मानले. या मुलीच्या घरी वारंवार येणाऱ्या एका महिलेनेच तिचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. याप्रकरणी आरोपीला अधिकाधिक शिक्षा होईल, याची पोलिस प्रयत्नशील असतील. दरम्यान, या कामगिरीनंतर मुंबई पोलिसांवर पुन्हा एकदा कौतुकाचा वर्षाव होत आहे.