मास्क न घालणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांचा दणका; 6 हजारहून अधिक नागरिकांवर दंडात्मक कारवाई
मुंबईत पुन्हा एकदा वाढू लागलेली कोरोना रुग्णसंख्या, तिसऱ्या लाटेचा धोका आणि अवघ्या काही दिवसांत येणारा गणेशोत्सव यामुळे पोलिस अधिक सतर्क झाले आहेत.
मुंबईत (Mumbai) पुन्हा एकदा वाढू लागलेली कोरोना रुग्णसंख्या, तिसऱ्या लाटेचा धोका आणि अवघ्या काही दिवसांत येणारा गणेशोत्सव यामुळे पोलिस अधिक सतर्क झाले आहेत. मास्क न घालता रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांनावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याने मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कामाला सुरुवात केली आहे. गुरुवारी (2 सप्टेंबर) मुंबईत मास्क न घालता फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून एका दिवसांत तब्बल 6 हजारहून अधिक लोकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.
दिंडोशी ते दहिसर पर्यंतच्या भागातून एकूण 719 लोकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. काळाचौकी ते सायनपर्यंतच्या भागात पोलिसांनी 666 जणांवर कारवाई केली आहे. तर चेंबूर ट्रॉम्बे या भागात 646 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय दादर, शिवाजी पार्क, माहिम, विनोबा भावे नगर, कुर्ला या भागात 555 लोक मास्कविना फिरत असल्याचे आढळून आले.
पायधुनीपासून ते मलबार हिलपर्यंत 549 लोक मास्कविना आढळले. भायखळा ते वरळी पर्यंतच्या भागात 542 लोकांवर कारवाई करण्यात तर मुलुंड ते घाटकोपरपर्यंतच्या भागात 553 जणांना दंड ठोठावण्यात आला. (मुंबईच्या सांताक्रुझ भागात मास्क न घातलेल्या प्रवाशाकडून दंड वसूलीसाठी मार्शल चालत्या कारच्या बोनेटला बिलगला; व्हिडिओ वायरल)
मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी मास्क न घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यासाठी मुंबईतील 13 परिमंडळात स्थानिक पोलीस स्टेशन आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त एक विशेष पथक गणेशोत्सवाच्या दरम्यान नेमण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोना नियमांचे पालन करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आहे.