Mumbai Police: कॉन्स्टेबल रेहाना शेख यांनी 50 मुलांना घेतले दत्तक; 10 वी पर्यंतचा शिक्षणाचा खर्च करणार
मुंबई पोलिसातही (Mumbai Police) असेच एक उदाहरण दिसून आले आहे. मुंबई पोलिस कॉन्स्टेबल रेहाना शेख (Rehana Shaikh) यांनी महाराष्ट्रातील 50 गरजू मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
असे बरेच पोलिस आहेत, जे आपल्या कर्तव्याच्या मर्यादेबाहेर जाऊन लोकांना मदत करतात. मुंबई पोलिसातही (Mumbai Police) असेच एक उदाहरण दिसून आले आहे. मुंबई पोलिस कॉन्स्टेबल रेहाना शेख (Rehana Shaikh) यांनी महाराष्ट्रातील 50 गरजू मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या म्हणाला, 'माझ्या मित्राने मला शाळेची काही छायाचित्रे दाखविली. त्यानंतर, मला असे वाटले की या मुलांना माझ्या मदतीची आवश्यकता आहे आणि मी 50 मुले दत्तक घेतली. दहावीपर्यंत या मुलांचा शैक्षणिक खर्च मी उचलणार आहे. अशा प्रकारे रेहाना शेख यांनी माणुसकीचे एक अद्भुत उदाहरण समोर ठेवले आहे.
40 वर्षीय रेहाना शेख यांनी रायगड येथील 50 गरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याबरोबरच 54 लोकांना प्लाझ्मा, ऑक्सिजन, रक्त आणि रुग्णालयाची मदत केली आहे. रेहाना शेख यांचा मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलिसांच्या कर्तव्यासह सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी आयुक्तांनी रेहाना यांना आपल्या कार्यालयात बोलावून प्रमाणपत्र दिले.
रेहाना म्हणाल्या, 'गेल्या वर्षी मला रायगडमधील शाळेबद्दल माहिती मिळाली. मुख्याध्यापकांशी बोलून तिथे पोहोचल्यावर लक्षात आले की, बहुतेक मुले गरीब कुटुंबातील आहेत. त्यांच्या पायात चप्पलही नव्हती. माझ्या मुलीचा वाढदिवस आणि ईदच्या खरेदीसाठी मी काही बचत केली होती, जी मी मुलांसाठी खर्च केली. 2000 साली कॉन्स्टेबल म्हणून पोलिस दलात रुजू झालेल्या रेहाना यांनी सांगितले की, गेल्या वर्षी त्यांनी एका हवालदाराच्या आईसाठी इंजेक्शन मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना प्रोत्साहन मिळाले आणि अधिकाधिक लोकांना मदत केली. (हेही वाचा: मराठा समाजाला न्याय हवा आहे, आश्वासन नको, असे सांगत खासदार संभाजीराजे भोसले यांनी कोपर्डी प्रकरणावरही केले भाष्य)
दरम्यान, रेहाना यांचे वडील अब्दुल नबी बागवान हे मुंबई पोलिसातून उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांचे पतीसुद्धा पोलिसात आहे. रेहाना शेख एथलीट आणि व्हॉलीबॉलपटू राहिल्या आहेत. 2017 मध्ये श्रीलंकेत आपल्या शक्तीचे प्रतिनिधित्व करत त्यांनी दोन सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले आहे.