Matunga Baby-Selling Racket: माटूंगा येथील अर्भक विक्री रॅकेटचा पर्दाफाश, मुख्य एजंटला अटक; मुंबई पोलिसांची कामगिरी
त्यांच्याकडून इतर बालकेही हस्तगत केली जात आहेत. जाणून घ्या संपूर्ण तपशील.
महाराष्ट्र (Maharashtra News), गुजरात (Gujarat) आणि कर्नाटक (Karnataka) आदी राज्यांमध्ये अर्भकविक्री (Baby Selling Racket) करणाऱ्या एका टोळीचा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पर्दाफाश केला आहे. ही टोळी अर्भके खरेदी किंवा चोरी करुन मिळवत असत आणि त्यांची तस्करी (Child Trafficking) करुन विक्री करत असे. चौकशीत पुढे आल्यानुसार, आतापर्यंत पाच बालकांची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटच्या मुख्य एजंटला माटुंगा पोलिसांनी (Matunga Police) कारवाई करुन अटक केली आहे. अब्दुलकरीम दस्तगीर नदाफ असे आरोपीचे नाव आहे. तो 52 वर्षांचा आहे. या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या नऊ महिलांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपीस अटक केली.
बेबी तांबोळी हिच्यासह नऊ महिलांना अटक
नवजात माता असलेल्या एका महिलेने आपल्या बाळाची 1 लाख रुपयांना विक्री केल्याची घटना 12 डिसेंबर रोजी उघडकीस आली होती. प्राप्त माहितीवरुन केलेल्या तत्काळ कारवाईत पोलिसांना अर्भक खरेदी विक्री प्रकरणाबाबत माहिती मिळाली. ज्यामुळे हे एक लहान मुलांची तस्करी करणारे रॅकेट असल्याचे पुढे आले. पोलिसांनी त्याच वेळी या प्रकरणाशी संबंधीत नऊ महिलांना अटक केली. तसेच, विक्री केलेल्या बाळास कर्नाटक येथून ताब्यात घेण्यात आले. ज्यामुळे बाळाचे प्राण आणि त्याच्यासोबत भविष्यात घडण्याऱ्या संभाव्य घटनांपासून बचाव झाला. या प्रकरणाबाबत बोलताना, पोलीस उपायुक्त (झोन IV) रागसुधा आर यांनी सांगितले की, ताब्यात घेतलेल्या महिलांच्या चौकशीदरम्यान, आरोपींपैकी एक असलेल्या बेबी तांबोळी हिने खुलासा केला की, तिचा पती नदाफ हा या टोळीचा मुख्य एजंट होता. ग्राहकांशी सौदे करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अर्भकांची खरेदी विक्री हा एक गंभीर गुन्हा आहे आणि त्याबाबत तपास सुरू आहे, असेही पोलीस उपायुक्तांनी सांगितले. (हेही वाचा, Child Trafficking in Maharashtra: महाराष्ट्रात बाल तस्करीच्या मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश; 59 मुलांची सुटका, 5 जणांना अटक)
एका अर्भकासाठी तब्बल 2 ते 3 लाख रुपये, दर पाहून पोलीसही चक्रावले
अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अर्भक खरेदी-विक्री करणाऱ्या सिंडिकेटने संभाव्य ग्राहकांकडून प्रत्येक बाळासाठी 2 लाख ते 3 लाख रुपये आकारले होते. महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या गुन्हे प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तींनी प्रत्येक व्यवहारासाठी 10,000 ते 20,000 रुपये कमावले. कर्नाटकातील हुक्केरी येथील रहिवासी असलेल्या नदाफने कथितपणे व्यवहार केले आणि सार्वजनिक वाहतुकीद्वारे बाळांच्या तस्करींसाठी समन्वय साधला.
तस्करी आणि संवादासाठी सोशल मीडिया ॲप्सचा वापर
पोलीस तपासात पुढे आले की, या टोळीने दळणवळण, संवाद साधण्यासाठी आणि व्यवस्थापण करण्यासाठी सोशल मीडिया ॲप्सचा वापर केला. आरोपींनी मुलांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी समन्वय साधण्यासाठी आणि तिकिटे बुक करण्यासाठी एका ॲपचा वापर केला. आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली असली तरी तपास जसजसा पुढे जाईल तसतशी ही संख्या वाढू शकते ", असे एका अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा, Baby Selling In Mumbai: आई-बापाने पोटच्या बाळाचा गे पुरूषासोबत केला 4.65 लाखांचा व्यवहार; 6 जण अटकेत)
कोणत्या राज्यात किती बालके विकली?
सिंडिकेटने एकूण पाच बाळांची विक्री केल्याची माहिती आतापर्यंत पुढे आली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रत्येकी दोन आणि कर्नाटकात एक अर्भक विकले आहे. त्यापैकी दोन मुली आणि तीन मुले होती. "उर्वरित बाळांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यापैकी एक पुण्यात, दुसरी औरंगाबादमध्ये आणि दोन गुजरातमध्ये आहेत", असे डीसीपी रागसुधा आर. यांनी सांगितले.
चालू आहे तपास
आरोपींनी ग्राहकांच्या मागण्यांच्या आधारे किंमती निश्चित करून रॅकेटने बाळांना वस्तू म्हणून वागवले असा पोलिसांना संशय आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, "हे मानवाधिकारांचे गंभीर उल्लंघन आहे आणि यात सामील असलेल्या सर्वांना न्याय मिळवून देण्यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली आणि संबंधित बाल संरक्षण कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. प्रकरणाचा तपास सुरु आहे.